कोरोना संकटातही पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 04:00 PM2021-06-12T16:00:53+5:302021-06-12T16:01:16+5:30
जगभरात सर्वाधिक गाढवं असलेल्या देशात पाकिस्तानचा तिसरा क्रमांक आहे. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 नुसार पाकिस्तानमध्ये गाढव हा एकमात्र प्राणी असा आहे, जो 2001-02 पासून दरवर्षी 1 लाखांच्या संख्येत वाढत आहे.
इस्लामाबाद - कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामध्ये, पाकिस्तानचही समावेश असून कोविडमुळे अर्थव्यवस्था घसरली आहे. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इम्रान खान सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या तीन वर्षात, दरवर्षी 1 लाख गाढवांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, सद्यस्थितीत पाकिस्तानमधील गाढवांची संख्या 56 लाखांवर पोहोचली आहे.
जगभरात सर्वाधिक गाढवं असलेल्या देशात पाकिस्तानचा तिसरा क्रमांक आहे. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 नुसार पाकिस्तानमध्ये गाढव हा एकमात्र प्राणी असा आहे, जो 2001-02 पासून दरवर्षी 1 लाखांच्या संख्येत वाढत आहे. त्याशिवाय, उंट, घोडे आणि खच्चर या जनावरांची संख्या गेल्या 13 वर्षात स्थिर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, यापूर्वी पीएमएल(एन) आणि पीपीपी सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळातही गाढवांची संख्या 4 लाखांनी वाढली होती.
एका करारानुसार पाकिस्तानमधून दरवर्षी 80 हजार गाढवं पाठविण्यात येतात. मांसाहार आणि इतर कामासाठी या गाढवांचा उपयोग चीनमध्ये केला जातो. गाढवाच्या कातड्याचाही उपयोग विविध कामांसाठी चीनमध्ये करण्यात येतो. गाढवाच्या कातड्यापासून निघणाऱ्या जिलेटीनद्वारे काही प्रकारची औषधेही बनविण्यात येतात. म्हणून, चीन कंपन्यांनी पाकिस्तानमधून गाढवांच्या खरेदीसाठी लाखो डॉलरची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये गाढवांच्या उपचारासाठी विशेष रुग्णालयही आहेत.