पगडी घातल्यामुळे शीख अभिनेत्याला विमानात प्रवेश नाकारला
By Admin | Published: February 9, 2016 11:34 AM2016-02-09T11:34:42+5:302016-02-09T12:53:41+5:30
विमानात बसण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान पगडी काढण्यास नकार दिल्याने एका शीख अमेरिकन अभिनेत्याला विमानात जाण्यापासून रोखल्याची घटना अमेरिकेत घडली
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ९ - विमानात बसण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान पगडी काढण्यास नकार दिल्याने एका शीख अमेरिकन अभिनेत्याला विमानात जाण्यापासून रोखल्याची घटना अमेरिकेत घडली. मेक्सिकोला गेलले ४१ वर्षांचे वारिस अहलूवालिया हे सोमवारी अॅरोमेक्सिकोच्या विमानाने न्यूयॉर्कला परत येणार होते. मात्र ते मेक्सिकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अॅरोमेक्सिकोच्या काऊंटरवर बोर्डिंग पास घेण्यासाठी गेले असता त्यांना एका कोड नंबरसह प्रथम श्रेणीचा पास देण्यात आला. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी करावी लागणार होती. व तेथे त्यांना पगडी उतरवण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांनी तसे करण्यास अहलुवालिया यांनी नकार देताच त्यांना विमानातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.
अहलुवालिया यांनी ट्विटरवर एक फोटो अपलोड करून या प्रकरणाची माहिती दिली. ' माझ्या पगडीमुळे मी न्यूयॉर्कला जाणा-या अॅरोमॅक्सिकोच्या विमानातून प्रवास करू शकत नाही असे मला सांगण्यात आले' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.