निष्पाप बळी ! अमेरिकेत शीख सॉफ्टवेअर इंजिनिअर विद्यार्थ्याची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 05:46 PM2017-09-02T17:46:45+5:302017-09-02T17:48:09+5:30
केवळ विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यानं रागातून अमेरिकेतील एका विद्यार्थ्यानं एका 22 वर्षीय शीख तरुणाची कथित स्वरुपात चाकूनं भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वॉशिंग्टन, दि. 2 - केवळ विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यानं रागातून अमेरिकेतील एका विद्यार्थ्यानं एका 22 वर्षीय शीख तरुणाची कथित स्वरुपात चाकूनं भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करण्यात आलेला शीख तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. एका मीडिया रिपोर्टनं याबाबतीचे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गगनदीप सिंह असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो येथे टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम करत होता. इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात शिकणारा गगनदीप सिंहवर त्याच्याच टॅक्सीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्यानं कथित स्वरुपात प्राणघातक हल्ला केला. गगनदीपची हत्या करणा-या आरोपीचं नाव जेकब कोलमन असे असून त्यानं स्पोकेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुढील प्रवासासाठी 28 ऑगस्ट रोजी गगनदीपची टॅक्सी पकडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गोनगाझा विद्यापीठात प्रवेश घेतलेला विद्यार्थी म्हणून जेकब कोलमननं स्पोकेन येथे दाखल झाला. मात्र विद्यापीठात पोहोचल्यानंतर त्याला विद्यापीठात प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात प्रवेश न मिळाल्याच्या रागातून जेकब कोलमनच्या मनात कुणाची तरी हत्या करण्याचे विचार येऊ लागले. तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनानं सांगितले की, कोलमनकडून विद्यापीठात अर्ज करण्यात आल्याची कोणतीही माहिती नोंद करण्यात आलेली नाही.
घटनेच्या दिवशी, कोलमननं गगनदीपची टॅक्सी भाड्यावर घेतली व एका काल्पनिक मित्राच्या घरी नेण्यास सोडण्यास सांगितले. शिवाय, प्रवासात हिंसक झाल्याचे व एका दुकानातून चाकू विकत घेतल्याची कबुलीही कोलमननं चौकशीदरम्यान दिली आहे.
यानंतर गगनदीप सिंहनं कोटनई शहरात टॅक्सी थांबवली आणि यावेळी कोलमननं त्यावर चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात गगनदीपचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात मृत पावलेला गगनदीप सिंह हा मूळचा पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी होता. 2003 पासून तो वॉशिंग्टन येथे वास्तव्यास होता. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अमेरिकी आणि शीख नागरिकांना निशाणा करुन त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांचं प्रमाण वाढत चालले आहे. जुलै महिन्यातही कॅलिफॉर्नियात एका आठवड्यात दोन शीख अमेरिकी नागरिकांची हत्या करण्यात आली होती.