एकसारखे दिसण्याचा असाही फटका; 17 वर्षे तुरुंगात काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:15 PM2018-12-24T15:15:55+5:302018-12-24T15:18:21+5:30
रिचर्ड अँथोनी असे या व्यक्तीचे नाव असून त्याला त्याने न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागली आहे.
कंन्सास : शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता नये, अशी ब्रीदवाक्ये मिरवणाऱ्या न्यायपालिकांकडूनही बऱ्याचदा चुका होत असतात. याचे जिवंत उदाहरण अमेरिकेत उघड झाले आहे. केवळ हुबेहूब दिसतो म्हणून एका व्यक्तीला 17 वर्षे तुरुंगात खितपत काढावी लागली आहेत. महत्वाचे म्हणजे 'तो मी नव्हेच' असे बेंबीच्या देठापासून ओरडूनही त्याच्यावर कोणाही विश्वास ठेवला नव्हता.
रिचर्ड अँथोनी असे या व्यक्तीचे नाव असून त्याला त्याने न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागली आहे. खरा गुन्हेगार रिकी ली अमोस याने त्याचा गुन्हा कबुल केल्यानंतर ही बाब उजेडात आली आहे. न्यायालायाने यानंतर माफी मागत रिचर्ड अँथोनीला मुक्त केले आणि 8 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.
कंन्सासचे महाधिवक्ता डेरेक श्मिट यांनी सांगितले की, खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात चूक झाली. मात्र, आता त्या गुन्हेगाराने गुन्हे कबुल केले आहेत. जेवढे शक्य होईल तेवढे हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केले जात आहेत. रिचर्ड अँथोनीला त्याच्या हक्काचे सर्व फायदे देण्यात येतील.
अँथोनी हा असा व्यक्ती आहे की ज्याने निर्दोष असूनही शिक्षा भोगली आणि त्याची नुकसान भरपाई मागितली आहे. खरेतर 199 मध्ये एका व्यक्तीने रोलँडस्थित वॉलमार्टच्या पार्किंगमधून महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याची महिलेसोबत झटापट झाली होती. पर्स वाचली परंतू महिलेचा मोबाईल फोन पळवला होता.
एका चालकाने चोराच्या कारचा नंबर पोलिसांना दिला. तसेच चालकाने त्याला पाहिले होते. तसेच त्याचे नाव रिकी असेही सांगितले होते. तेथील उपस्थितांनी दिलेल्या वर्णनानुसार अँथोनीला पोलिसांनी अटक केली. त्याला चालकानेही ओळखले.
खरे म्हणजे चोरीच्या वेळी अँथोनी त्याच्या प्रेयसीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये होता. त्याने दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत सिनेमेही पाहिले. तपासावेळी त्याच्या नावावर अनेक गुन्हे आढळले. यामुळे न्यायालयाने त्याला 19 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावेळी अँथोनीने तो निर्दोष असल्याचे सांगितले होते. शेवटी त्याने कंन्सास विद्यापीठाच्या प्रोजेक्ट ऑफ इनोसेंसमध्ये धाव घेतली. याद्वारे निरपराध्यांना न्याय देण्याचे काम होते. त्यांनी खरा गुन्हेगार रिकी ली अमोसला शोधून काढले आणि खरा खुलासा झाला.