'टीकटॉक टीशॉक' टोपणनावाने लोकप्रिय सायमन हॅरिस बनले आयर्लंडचे सर्वात तरूण पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:36 PM2024-04-10T13:36:51+5:302024-04-10T13:38:18+5:30
TikTok Taoiseach Simon Harris Ireland PM: 'टीकटॉक टीशॉक' म्हणजे काय? PM हॅरिस यांचे हे टोपणनाव कसे पडले? वाचा सविस्तर
TikTok Taoiseach Simon Harris Ireland PM: आयर्लंडचे खासदार सायमन हॅरिस यांची मंगळवारी संसदेत बहुमताने आयर्लंडचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. वयाच्या ३७व्या वर्षी देशाचे पंतप्रधान बनून देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा मान त्यांनी मिळवला. हॅरिस यांनी लिओ वराडकर यांच्या जागी आयर्लंडच्या त्रिपक्षीय आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. वराडकर यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली होती. त्यानंतर, वराडकर यांच्या सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम केलेल्या हॅरिस यांची त्याजागी नियुक्ती करण्यात आली. सेंटर-राइट फाइन गेल (The Centre-right Fine Gael) या तीन पक्षांच्या आघाडीकडून वराडकर यांची जागा घेणारे हॅरिस हे एकमेव उमेदवार होते.
आयरिश संसदेचे कनिष्ठ सभागृह Dáil मधील खासदारांनी 69 विरुद्ध 88 अशा बहुमताने हॅरिस यांना टीशॉक (taoiseach) किंवा पंतप्रधान बनवण्याचा मार्ग मोकळा केला. डब्लिन येथील राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या एका समारंभात राष्ट्राध्यक्ष मायकल डी हिगिन्स यांनी या पदावर त्यांची औपचारिक नियुक्ती केली. हॅरिस हे वयाच्या २४व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून गेले होते आणि सोशल मीडियावर संवाद साधण्याच्या त्यांच्या या आवडीमुळेच त्यांना TikTok Taoiseach (टीकटॉक टीशॉक) असे टोपणनाव देण्यात आले होते.
आज तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा सन्मान करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे. Taoiseach म्हणून मला सार्वजनिक जीवनात नव्या कल्पना राबवयच्या आहेत. नवी ऊर्जा आणि परस्पर सहाय्याची भूमिका मी नेहमी अंगी बाणवेन, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.