रस्त्यावर साधा खड्डा पडला....बुजवायला गेले अन् धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:56 PM2019-02-01T17:56:56+5:302019-02-01T17:58:43+5:30
या खड्ड्याबाबत एका मोटारसायकल चालकाने तक्रार केली होती. यानंतर हा खड्डा बुजविण्यासाठी शहरातील रस्ते बांधकाम विभागाचे कर्मचारी दाखल झाले.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेमब्रोक पाईन्स शहरामध्ये एका रस्त्यावर खड्डा पडला, त्याला लोकांनी रस्ता नेहमीप्रमाणे खचला असेल असे मानले. मात्र, संशय आल्याने बांधकाम विभागाने केलेल्या तपासात बँकेपर्यंत गेलेला सुरुंग सापडल्याने खळबळ उडाली आहे. चोरांनी हा सुरुंग बँकेच्या तळघरापर्यंत खोदला होता.
या खड्ड्याबाबत एका मोटारसायकल चालकाने तक्रार केली होती. यानंतर हा खड्डा बुजविण्यासाठी शहरातील रस्ते बांधकाम विभागाचे कर्मचारी दाखल झाले. रस्ता खचल्याचे पाहून त्यांनी खड्ड्यामध्ये दगड भरण्यास सुरुवात केली, मात्र, आतील माती कोसळून भुयार दिसू लागले. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तपासात रस्त्याखालून भुयार गेल्याचे दिसले. जवळपास दोन ते तीन फूट रुंदीचा बोगदा खणला होता. या खड्ड्यात उतरल्यावर तेथे एक जनरेटर आणि वीजेच्या वायर दिसल्या. आतमध्ये गेल्यावर एक सुरुंग खणल्याचे दिसले. यामध्ये बूट आणि स्टूलही आढळून आले.
एफबीआयच्या एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, चोर या बँकेच्या एटीएमपर्यंत पोहोचणार होते. मात्र, रस्ता खचल्याने ते पळून गेले. रहदारी असलेल्या रस्त्याखाली हा प्रकार घडला आहे.