सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:35 PM2024-05-01T16:35:29+5:302024-05-01T16:35:37+5:30
Goldy Brar Death in America: भारतात वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडवून गोल्डी अमेरिकेत फरार झाला होता. परंतु सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो प्रकाशझोतात आला होता.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या करण्याता आल्याचा दावा करण्यात आला आहे. डल्ला-लखबीर गँगने याची जबाबदारी घेतली असून गुन्हे जगतात खळबळ उडाली आहे.
गोल्डी ब्रारला अमेरिकेत गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोल्डीचे खरे नाव सतिंदरजीत सिंग असे आहे. त्याचे वडील हे पंजाब पोलिसमध्ये पीएसआय होते. ते आता निवृत्त झाले आहेत.
मंगळवारी सायंकाळी गोल्डी त्याच्या फेयरमोंट, होल्ट एवेन्यू येथील घरासमोर उभा असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गोल्डीसोबत त्याचे साथीदारही होते. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोल्डीचा मृत्यू झाल्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
भारतात वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडवून गोल्डी अमेरिकेत फरार झाला होता. परंतु सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो प्रकाशझोतात आला होता. चुलत भाऊ गुरलाल ब्रारची हत्या झाल्यानंतर त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकले होते. २०२० मध्ये विद्यार्थी नेता असलेल्या गुरलालची हत्या झाली होती. गुरलाल हा लॉरेन्स बिश्नोईचा अत्यंत जवळचा होता. रस्त्यावर रक्त सुकणार नाही, अशी पोस्ट लॉरेन्स गँगने सोशल मीडियावर केली होती.
परंतु तोवर गोल्डी शैक्षणिक व्हिसावर कॅनडाला गेला होता. तिथून त्याने पंजाबमध्ये हत्याकांड सुरु केले होते. त्याच्या टोळीतील लोकांकडून पंजाब, हरियाणामध्ये त्यांना गुन्हे घडविण्यास सुरुवात केली होती. २०२१ मध्ये भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गोल्डीने काँग्रेसचा युवा नेता गुरलाल सिंग याची हत्या केली होती.