गाणाऱ्या टाइपरायटर्सचा ‘बोस्टन ऑर्केस्ट्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:27 AM2021-02-26T00:27:44+5:302021-02-26T00:28:00+5:30

टीम डेव्हीन हा या ग्रुपचा सर्वांत जुना मेंबर. एकदा रात्री बारमध्ये बसलेला असताना त्याच्या गर्लफ्रेण्डनं त्याला एक टाइपरायटर गिफ्ट केला.

Singing typewriters 'Boston Orchestra' | गाणाऱ्या टाइपरायटर्सचा ‘बोस्टन ऑर्केस्ट्रा’

गाणाऱ्या टाइपरायटर्सचा ‘बोस्टन ऑर्केस्ट्रा’

Next

तुम्ही शेवटचं पत्र कधी, कोणाला पाठवलंय? नाही ना आठवत? कारण हल्ली तुम्ही पत्र पाठवलंच नसेल. मोबाइल, कॉम्प्युटर, व्हॉट्सॲपच्या जमान्यात पत्र  इतिहासजमा झाली. पण पत्रांचं महत्त्व जुन्या काळात किती होतं ते कुणीही नाकारणार नाही. तसंच टाइपरायटरचे. पूर्वी गल्लोगल्ली टाइपरायटिंग शिकवणाऱ्या संस्था असायच्या.

भविष्यातील एक अत्यावश्यक गोष्ट किंवा ‘करिअर’ म्हणून तर विद्यार्थी त्याकडे बघायचेच, पण उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की पालकांचाही मुलांना आग्रह असायचा, जा, टायपिंग शिकून घे ! पण नंतर संगणकानं टाइपरायटर्सनाही अक्षरश: इतिहासजमा करून टाकलं. काळाच्या ओघात गडप, निरुपयोगी झालेल्या अशा अनेक गोष्टी.. पण त्यावर प्रेम असणाऱ्या काहींनी अजूनही त्या जपून ठेवल्या आहेत. 

टाइपरायटरवर प्रेम असलेलेही असेच काहीजण. पण त्याकडे केवळ एक ‘पुरातन’, ‘ऐतिहासिक’ गोष्ट म्हणून न पाहता त्यांनी त्यातूनच संगीत निर्माण केलं ! एरवी टाइपरायटरच्या कर्कश्श खडखडाटातून कधी संगीत निर्माण होईल, त्याचा ऑर्केस्ट्रा निघेल, अल्बम्स तयार होतील याचा कोणी विचारही केला नसेल! पण बोस्टनमधील काही टाइपरायटरप्रेमींनी गतकाळातील त्याच्या सुवर्णयुगाबद्दल केवळ हळहळ व्यक्त न करता त्यातूनच नवनिर्माण केलं.

काही समानप्रेमी एकत्र आले आणि त्यांनी आपला एक आगळावेगळा असा ऑर्केस्ट्रा तयार केला. त्यांचे तीन अल्बम्सदेखील निघाले आहेत आणि लोकांनाही हे अनोखं संगीत चांगलंच भावलं आहे. टाइपरायटरच्या माध्यमातून त्यांनी केवळ संगीतच निर्माण केलं नाही तर त्यातून विनोद आणि उपहासाचा एक वेगळाच आविष्कार समोर आणला.‘बोस्टन टाइपरायटर ऑर्केस्ट्रा’ या नावानं हा ग्रुप प्रसिद्ध आहे.

संगीतातलं  ‘नोटेशन’ यात नसलं तरी त्यांच्या या संगीताला बीट आहे, रिदम आहे आणि ट्यूनही आहे. त्यासाठी खास तयार केलेल्या विनोदी गाण्यांवर लोक डोलतात आणि पोटभर हसतातही. या ग्रुपमधील मुख्य सदस्य आहेत, डेरिक अलबेरेटेली, ख्रिस्तोफर नी, ब्रेण्डन क्विगली, अलेक्स होलोमन आणि जे ओ’ग्रण्डी ! या ऑर्क्रेस्ट्रामधील हे सर्व कलाकार ४० ते ६० वयोगटांतील आहेत. यातलं कोणी बायोलॉजिस्ट, कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर, बँकर तर कोणी लायब्ररीअन असे त्यांचे जॉब असले  तरी प्रत्येकाचं टाइपरायटरवरील आणि त्यातून तयार होणाऱ्या संगीतावर प्रचंड प्रेम आहे. ज्यावेळेस ते आपला कार्यक्रम सादर करतात, त्यावेळी प्रत्येकानं ऑफिसला जाताना घालतात तसा फॉर्मल वेश परिधान केलेला असतो. 

गेल्या तब्बल १७ वर्षांपासून म्हणजे २००४ पासून टाइपरायटर संगीताचा आपला हा लाइव्ह कार्यक्रम अमेरिकेत ठिकठिकाणी ते सादर करतात.  अलीकडेच म्हणजे २०२०मध्ये आलेल्या त्यांच्या नव्या अल्बम्सचे नाव आहे ‘वर्कस्टेशन टू वर्कस्टेशन’. सादरीकरणासाठी हिपहॉप हा त्यांचा आवडता प्रकर असला तरी वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ते टाइपरायटरवर वाजवतात. टाइपरायटरमधून विशिष्ट प्रकारचे सूर निघावेत यासाठी त्यांनी काही कल्पक उपाययोजना केल्या आहेत.

सर्व टाइपरायटर वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे काही मोठे तर काही छोटे, पोर्टेबल टाइपचे आहेत. त्यांची कळ दाबल्यावर निघणारे संगीताचे सूरही वेगवेगळे आहेत. त्यासाठी त्यांच्या टाइपरायटरला त्यांनी प्लॅस्टिक शिट‌्स, मेटलचे पाइप, बेल्स आणि इतरही काही मटेरियल्स लावलेले आहेत. खूप परिश्रम आणि मेहनत घेऊन त्यांनी हा उपाय शोधून काढला आहे. त्यासाठी टाइपरायटरला काय जोडले म्हणजे कसा आवाज येतो, आपल्याला कसा आवाज, नाद पाहिजे आहे, यासाठी त्यांनी निरंतर संशोधन केलं . हा प्रकार अजूनही सुरू आहे.

अर्थातच टाइपरायटरवरून संगीत निर्माण करणं हे सोपं काम नाही. त्यातली सर्वांत मोठी मर्यादा म्हणजे टाइपरायटरवर फक्त बोटं आपटूनच संगीत निर्माण करता येऊ शकतं. त्यांची कळ (की) दाबण्याचा दाब केवळ आपण कमी-जास्त करू शकतो. आपल्याला अपेक्षित प्रतिसाद आणि सूर त्यातून निघतीलच याची शाश्वती नाही. केवळ कळ दाबून संगीत निर्माण करायचं असल्यामुळे त्यातून सुमधूर, कानाला अत्यंत गोड वाटेल असं संगीत निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे या संगीताला गाणी आणि विनोदाची जोड देण्यात आली. खास नवीन गाणी रचली गेली आणि एक वेगळंच संगीत आणि रसिकवर्ग त्यातून निर्माण केला गेला. हिपहॉप प्रकारचं संगीत या प्रकाराला अधिक मानवतं. त्यानं या संगीताला एक मानवी चेहरा दिला आहे.

बारमध्ये झाला ऑर्केस्ट्राचा जन्म ! 

टीम डेव्हीन हा या ग्रुपचा सर्वांत जुना मेंबर. एकदा रात्री बारमध्ये बसलेला असताना त्याच्या गर्लफ्रेण्डनं त्याला एक टाइपरायटर गिफ्ट केला. त्यानं तिथल्या तिथे त्यावर बोटं मारून संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कर्कश्श आवाजामुळे आजूबाजूचे लोक वैतागले आणि त्यांनी त्याला हा बेसूर बंद करायला लावला. टीम सांगतो ‘मी बोस्टन टाइपरायटर ऑर्केस्ट्रा’चा संयोजक आहे!”- त्यावेळी वेळ मारून नेण्यासाठी त्यानं हे उत्तर दिलं, पण नंतर समानप्रेमी रसिक मिळवून खरोखरच हा ऑर्केस्ट्रा जन्माला आला !

Web Title: Singing typewriters 'Boston Orchestra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.