श्रीलंकेत सिरीसेना विजयी, राजपाक्षे पराभूत

By admin | Published: January 10, 2015 12:16 AM2015-01-10T00:16:44+5:302015-01-10T00:16:44+5:30

मतदारांनी विद्यमान अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचा दारुण पराभव करीत नवे अध्यक्ष म्हणून मैत्रीपाला सिरीसेना यांना निवडून दिले आहे.

Sirisena wins in Sri Lanka, defeats Rajpakas | श्रीलंकेत सिरीसेना विजयी, राजपाक्षे पराभूत

श्रीलंकेत सिरीसेना विजयी, राजपाक्षे पराभूत

Next

कोलंबो : श्रीलंकेतील ऐतिहासिक निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, मतदारांनी विद्यमान अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचा दारुण पराभव करीत नवे अध्यक्ष म्हणून मैत्रीपाला सिरीसेना यांना निवडून दिले आहे. या अटीतटीच्या निवडणुकीने राजपाक्षे यांची १० वर्षांची सत्ता संपविली आहे.
राजपाक्षे यांचे मंत्रिमंडळातील माजी आरोग्यमंत्री व श्रीलंका फ्रीडम पक्षाचे सरचिटणीस सिरीसेना (६३) यांनी ६,२१७,१६२ वा ५१.२ टक्के मते मिळविली असून राजपाक्षे यांना (५,७६८,०९०) ४७.६ टक्के मते मिळाली आहेत. श्रीलंकेचे निवडणूक आयुक्त महिंद देशप्रिया यांनी मैत्रीपाला सिरीसेना विजयी झाल्याची, तसेच श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याची घोषणा केली. या अटीतटीच्या निवडणुकीत राजपाक्षे यांच्या दहा वर्षांच्या राजवटीचा अंत झाला आहे. राजपाक्षे यांनी घटनेत दुरुस्ती करून तिसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविण्याची तरतूद केली होती.
त्यांना तिसऱ्यांदा निवडून येण्याची खात्री होती. त्यामुळेच त्यांनी दोन वर्षे आधी निवडणुकीची घोषणा केली. श्रीलंकेतील १५.०४ दशलक्ष मतदारांपैकी ७५ टक्के लोकांनी मतदान केले.
राजपाक्षे (६९) यांच्यावर घराणेशाही राबविल्याचा, तसेच भ्रष्टाचाराचा आरोप होता. त्यांनी शुक्रवारी सकाळीच आपला पराभव मान्य केला व टेंपल ट्रीज हे अध्यक्षीय निवासस्थानही सोडले. सिरीसेना यांनी निवडणूक जिंकल्यानंतर राजपाक्षे यांचे स्वच्छ निवडणुकीसाठी आभार मानले.
सिरीसेना यांना अल्पसंख्य मुस्लिम व तामिळ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. तामिळ मतदारांची संख्या १३ टक्के असून, राजपाक्षे यांनी लिट्टेचा बीमोड केल्यामुळे, तसेच युद्धकाळात मानवी हक्कांचा भंग केल्यामुळे तामिळ मतदार त्यांच्यावर संतप्त होते.
राजपाक्षे यांनी सुरळीत सत्तांतराचे आश्वासन दिले होते. राजपाक्षे यांनी लिट्टेविरोधातील युद्ध संपविल्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर ठेवलाच पाहिजे, असे विरोधी पक्षनेते राणिल विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.
मैत्रीपाला सिरीसेना
सिरीसेना यांनी आदल्या रात्री अध्यक्ष राजपाक्षे यांच्याबरोबर भोजन केले व दुसऱ्या दिवशी पक्ष सोडला. सिरीसेना यांना विरोधी पक्ष युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) बुद्धिस्ट नॅशनॅलिस्ट जेएचयू किंवा हेरिटेज पार्टी व अनेक तामिळ व मुस्लिम अल्पसंख्य पक्षांचा पाठिंबा होता. सिरीसेना हे कट्टर बुद्धिस्ट असून ते इंग्रजी बोलत नाहीत. त्यांची वेशभूषाही श्रीलंकेच्या परंपरेप्रमाणे असते. (वृत्तसंस्था)

४तामिळ भागात प्रचार करताना सिरीसेना यांनी तामिळ दहशतवाद्यांबाबत आपले धोरण सौम्य नसेल असे स्पष्ट केले आहे. अध्यक्षीय निवडणुकीत तामिळ मतदारांनी पाठिंबा दिला म्हणून उत्तर श्रीलंकेतील लष्करही काढून घेणार नाही, कारण राष्ट्राची सुरक्षा हे माझे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले होते. लिट्टेला श्रीलंकेत पुन्हा संघटित होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तामिळ नॅशनल अलायन्स (टीएनए) वा श्रीलंका मुस्लिम काँग्रेसशी करार वा युती केलेली नाही असेही त्यांनी सांगितले आहे. सिरीसेना यांचा कोलंबोतील उच्च वर्तुळाशी संपर्क नाही. कोलंबोतील कोणत्याही श्रीमंत शाळेत त्यांचे शिक्षण झाले नाही. राजापाक्षे यांच्या तुलनेत साधे असणाऱ्या सिरीसेना यांचे ग्रामीण भागात वर्चस्व आहे.

४प्रचाराच्या काळात राजपाक्षे यांच्या सत्ताधारी आघाडीतून २६ खासदार बाहेर पडले व त्यांनी निवडणुकीआधीच राजपाक्षे यांच्या पराभवाचे भवितव्य वर्तविले होते. राजपाक्षे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक नातेवाईक वरिष्ठ पदावर बसविले व पक्षाचे जुने कार्यकर्ते बाजूला पडले.

Web Title: Sirisena wins in Sri Lanka, defeats Rajpakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.