इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत सिसी विजयी

By admin | Published: May 30, 2014 03:21 AM2014-05-30T03:21:28+5:302014-05-30T03:21:28+5:30

इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लष्करप्रमुख जनरल अब्देल फतेह अल-सिसी हे ९६ टक्के मते मिळवून विजयी झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

Sisi won in Egypt's presidential election | इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत सिसी विजयी

इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत सिसी विजयी

Next

कैरो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लष्करप्रमुख जनरल अब्देल फतेह अल-सिसी हे ९६ टक्के मते मिळवून विजयी झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. अधिकृत निकाल रविवारी किंवा सोमवारी घोषित करण्यात येणार आहे. सिसी यांच्या विजयामुळे लष्कराची सत्तेवरील पकड पुन्हा घट्ट झाली आहे. इजिप्तमधील पहिल्या लोकशाही सरकारविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाल्यानंतर सिसी यांनीच ते उलथवून टाकले होते. सिसी हेच देशाला राजकीय आणि आर्थिक स्थैर्य देऊ शकतात, असा दावा त्यांचे समर्थक करत असले तरी अपेक्षेहून कमी मतदान झाल्यामुळे अब्देल यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. सिसी यांचे प्रतिस्पर्धी डाव्या विचारसरणीचे हमदीन सबाही यांना केवळ ४ टक्के मते मिळाली, तर १0 लाखांहून अधिक मते बाद घोषित करण्यात आली. इजिप्तमध्ये ५४ दशलक्ष एवढी मतदारसंख्या असून केवळ ४७ टक्के एवढेच मतदान झाले होते. सिसी यांनी गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाचा फारसा प्रभाव न पडल्याचे दिसून आले. मोहंमद मुर्सी यांना राष्ट्राध्यक्ष बनविणार्‍या २०१२ मधील निवडणुकीत याहून कितीतरी अधिक मतदान झाले होते. मुर्सी हे जनतेतून निवडून आलेले इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. (वृत्तसंस्था) मात्र, त्यांच्या सरकारविरुद्ध प्रचंड निदर्शने सुरू झाल्यानंतर सिसी यांनी गेल्यावर्षी त्यांना पदावरून हटविले होते. एका वृत्तसंस्थेच्या चमूने मतदान केंद्रांना भेटी दिल्या असता त्यांनाही मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. राजकीय औदासीन्य आणि आणखी एक लष्करी अधिकारी राष्ट्राध्यक्ष बनण्यास विरोध म्हणून अनेक मतदारांनी मतदानाऐवजी घरीच थांबणे पसंत केले, असे काही मतदारांनी सांगितले. याशिवाय स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची तरुण पिढीत बळावलेली भावना व इस्लामी संघटनांनी मतदानावर बहिष्काराचे केलेले आवाहनही याला कारणीभूत ठरल्याचे काहींनी सांगितले. ही निवडणूक केवळ एक नाटक आहे, फार्स आहे, असे इमबाबा जिल्ह्यातील रहिवासी महमूद इब्राहिम याने सांगितले. मतदानाचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, केवळ एका माणसासाठी माध्यमे खोटे चित्र सादर करतील, असेही तो म्हणाला.

Web Title: Sisi won in Egypt's presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.