मार्क झुकरबर्ग यांच्या बहिणीसोबत विमानात छेडछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 09:15 AM2017-12-02T09:15:59+5:302017-12-02T10:55:11+5:30
सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्गनं लॉस एन्जेलिस येथे मेक्सिको फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.
वॉशिंग्टन - सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्गनं लॉस एन्जेलिस येथे मेक्सिको फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. बुधवारी सोशल मीडियावर त्यांनी या गैरवर्तनासंदर्भातील माहिती पोस्ट केलं होतं. दरम्यान, ''प्रवाशाकडून रँडी झुकरबर्ग यांची छेडछाड होत असताना, संबंधित विमानातील अटेंडेन्टनं ही घटना रोखली नाही,असा दावा करण्यात आला आहे. यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे स्पष्टीकरण अलास्का एअरलाईन्सनं दिले आहे.
अलास्का एअरलाईनच्या एक्झिक्युटिव्हला लिहिण्यात आलेल्या पत्रात रँडीनं असे म्हटले आहे की, ''शेजारी बसलेल्या व्यक्तीमुळे अत्यंत गैरसोय होत होती. कारण संबंधित व्यक्ती फर्स्ट क्लासमधील अन्य प्रवाशांवरही अश्लिल शेरेबाजी व अत्यंत खालच्या स्तरातील भाषेत टिप्पणी करत होता. संबंधित व्यक्ती हस्तमैथुनसंदर्भात आणि माझ्या सहकर्मचा-यांबाबतही आक्षेपार्ह विधानं करत होता. शिवाय विमानात येणा-या महिला प्रवाशांबाबतही अश्लिल टिप्पणी करत होता''.
रँडी यांनी पुढे सांगितले की, ''संबंधित व्यक्तीची फ्लाइट अटेंडेन्टकडेही तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय, एअरलाइन्स कर्मचा-यांकडून या घटनेला खासगी पातळीवर न घेण्याचा सल्ला देत त्यांची जागा बदलली गेली. यावर रँडी यांनी खेद व्यक्त केला.
''माझी छेडछाड केली जात असतानाही, मी माझी जागा सोडून दुसरीकडे का म्हणून जावं'', अशी नाराजीही रँडी यांनी पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर चौकशी सुरू असून तपासणीमध्ये संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास आरोपीच्या यात्रेसंबंधित विशेषाधिकार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.