व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडाची सफर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:37 AM2018-03-15T04:37:59+5:302018-03-15T04:37:59+5:30
वर्ष १९६१. ब्रिटनच्या ग्रीनविच शोध विद्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांना विज्ञान संमेलनात निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. नारळीकर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीत अध्ययन करीत होते.
वर्ष १९६१. ब्रिटनच्या ग्रीनविच शोध विद्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांना विज्ञान संमेलनात निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. नारळीकर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीत अध्ययन करीत होते. एका विद्यार्थ्याने त्यांना विश्वाच्या उत्पत्तीबाबत प्रश्न विचारून अक्षरश: भंडावून सोडले होते. बिग बँग थिएरी नेमकी काय आहे, असे हा विद्यार्थी विचारत होता. या पहिल्या मुलाखतीतच नारळीकर यांना या विद्यार्थ्याच्या असामान्य बुद्धीची चुणूक लक्षात आली होती. तो नारळीकर यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. पुढे हे दोघेही ब्रिटनच्या केब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये सहाध्यायी होते. तो विद्यार्थी म्हणजे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग!
याच हॉकिंग यांनी सैद्धांतीक भौतिकशास्त्रात मोलाचे योगदान दिले. भौतिकशास्त्रात गुरुत्वाकर्षण, ब्रम्हांड विज्ञान, क्वांटम थिएरी, सूचना सिद्धांत आणि थर्माेडायनॅमिक्स आदी अनेक मूलभूत संकल्पना होत्या. या सर्व संकल्पनांना एकत्रित जोडण्याचे काम स्टीफन हॉकिंग यांनी केले. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबाबत त्यांनी मांडलेले बहुतांश विचार शास्त्रज्ञांनी स्वीकारले आहेत. १९७० साली कृष्णविवरांबाबत त्यांनी अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली, तेव्हा त्यांचा आजार इतका बळावला होता की, त्यांना कुबड्यांच्या आधारेही चालणे शक्य होत नव्हते.
हॉकिंग यांनी कायम संवादावर भर दिला. वादात ते पडत नसत. विश्वाची उत्पत्ती आणि लय होण्यात गुरुत्वाकर्षणाची मुख्य भूमिका आहे, हा विचार ते मांडत असत. ईश्वर या संकल्पनेवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. आपल्या ‘द ग्रँड डिझाइन’ मध्ये त्यांनी याबाबत लिहिले आहे. अचानक होणाऱ्या भूशास्त्रीय घटनांमुळे आपण जीव म्हणून अस्तित्वात आहोत, आपल्या अस्तित्वासाठी ईश्वराची गरज नाही, असे ते म्हणत. यामुळे ख्रिश्चन धर्मगुरुंचा रोषही त्यांना पत्करावा लागला. आपल्या विश्वाखेरीज ब्रम्हांडात अन्य कोणत्यातरी ग्रहावर जीवन असेल, असा त्यांना विश्वास होता.
‘लाइफ इन द युनिव्हर्स’ या पुस्तकात त्यांनी भविष्यात मानव आणि परग्रहवरील एलियन यांची भेट होईल, असे भाकित वर्तविले आहे. पृथ्वीवरील मानवाकडे आता शेवटची १०० वर्षे उरली आहेत, आपले अस्तित्त्व वाचवायचे असेल तर मानवाला अन्य ग्रहावर राहण्याची सवय करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याने मोठे वादंग उठले होते.
विश्वाच्या उत्पत्तीबाबत अखंड चिंतन करणाºया स्टीफन यांना नियतीने मात्र दगा दिला. अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना मोटार न्यूरॉन हा आजार झाला होता. डॉक्टरांनी ते केवळ दोन ते तीन वर्षे जगतील, असे सांगितले होते. परंतु त्यांनी आजाराला जुमानले नाही. आयुष्याचा खूप मोठा काळ त्यांनी व्हीलचेअरवर काढला. व्हॉइस सिंथेसायझरच्या सहाय्याने ते लोकांशी बोलत, संवाद साधत, जगभर अभ्यासपूर्ण लेक्चर्सही देत.
>हॉकिंग
यांना वाहिली
नासाची
आगळीवेगळी
श्रद्धांजली
२००७मध्ये नासाने शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीतल्या अवस्था दर्शविणारा एक कार्यक्रम काही तांत्रिक सुधारणा केलेल्या बोर्इंग विमानात आयोजिला होता.हे विमान फ्लोरिडा येथील जॉन केनेडी अंतराळ केंद्रावरील अवकाशात घिरट्या घालत असताना पार पडलेल्या या कार्यक्रमात व्हीलचेअरविना काही मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत व्यतित केलेले स्टीफन हॉकिंग पाहायला मिळतात.त्याचा व्हिडिओ नासाने ट्विटरवर बुधवारी झळकवून हॉकिंगना आगळ््या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. काही मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत राहिलो, त्यावेळी मला सुपरमॅन झाल्यासारखे वाटले होते असे स्टीफन हॉकिंग यांनी त्यावेळी पत्रकारांना सांगितले होते.चित्रपट : हॉकिंग यांची जीवनकहानी सांगणारा ‘थेअरी आॅफ एअरीथिंग’ चित्रपटही २०१४साली प्रदर्शित झाला होता. स्टिफन हॉकिंग यांची भूमिका साकारणारे एडी रेडमेन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आॅस्करही मिळाला होता.
>स्टीफन हॉकिंग यांच्या बुद्धीने आमचे जग आणि आमच्या विश्वाचे गूढ कमी केले. त्यांचे धाडस आणि आनंदीवृत्ती येणाºया पिढ्यांना प्रेरणा देणारी असेल.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
हॉकिंग यांच्या निधनाने वैज्ञानिक जगाची मोठी हानी झाली आहे.
- एम. व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती
हॉकिंग यांचे धैर्य आणि चिकाटी ही संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी होती. त्यांनी जे कार्य केले त्यामुळे जग चांगले बनले.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हॉकिंग यांनी विज्ञानाचे वाचन व ते समजून घेणे सोपे केले त्यांनी गुंतागुंतीची क्षेत्रे सोपी करून सांगितली.
- निर्मला सीतारामन, संरक्षणमंत्री
ते तर्क आणि वैज्ञानिक वृत्तीसाठी मार्गदर्शक ठरले. शारीरिकदृष्ट्या आव्हानांना तोंड देत असूनही ते आधुनिक भौतिकशास्त्रात सेलेब्रिटी होते.
- राहुल गांधी,
अध्यक्ष, कॉँग्रेस
>गाजलेली पुस्तके
ब्रिफ हिस्टरी आॅफ टाइम, ब्लॅक होल अॅण्ड बेबी युनिवर्सेस अॅण्ड अदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, आॅन द शोल्डर्स आॅफ जायंट्स