६ जणांमुळे अमेरिकेच्या कन्सास राज्यात पेंच, मतदारही नसलेल्यांना व्हायचेय गव्हर्नर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:42 AM2018-02-12T00:42:07+5:302018-02-12T00:42:20+5:30
अमेरिकेच्या कन्सास या राज्याच्या गव्हर्नरपदासाठी सहा अल्पवयीन मुले गांभीर्याने निवडणूक रिंगणात उतरल्याने मुरब्बी राजकारण्यांपुढे काहीसा पेंच निर्माण झाला आहे.
कन्सास सिटी : अमेरिकेच्या कन्सास या राज्याच्या गव्हर्नरपदासाठी सहा अल्पवयीन मुले गांभीर्याने निवडणूक रिंगणात उतरल्याने मुरब्बी राजकारण्यांपुढे काहीसा पेंच निर्माण झाला आहे. मजेची गोष्ट म्हणजे शाळा-कॉलेजांमध्ये शिकणारी ही किशोकवयीन मुले निवडणुकीत मतदारही नाहीत. कन्सास राज्यात गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कायद्यातील या उणीवेचा फायदा घेत या सहाजणांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाºया गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या सहा अल्पवयीन उमेदवारांपैकी १६ वर्षांचा जोसेफ तुतेरा (ज्यू.) हा सर्वात तरुण आहे. त्याच्याखेरीज अॅरॉन कोलमन , टायलर रुझिच, डॉमिनिक स्कावुझो, इथान रँडलीज आणि जॅक बर्गेसनही पाच अल्पवयीन मुलेही निवडणूक रिंगणात उतरली आहेत.
जॅक बर्गेसन हा अल्पवयीन मुलगा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार असून त्याला किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्याची इच्छा आहे. त्याशिवाय मारिजुआनाला कायदेशीर मान्यताही द्यायची आहे. डॉमिनिक स्कावुझो किमान वेतनात वाढ करण्याचे प्रयत्न करू इच्छितो. टायलर रुझिच हा शाळकरी विद्यार्थी असून तो रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे. जोसेफ तुतेरा ज्युनिअर हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असून त्याच्या मते युवकांकडे अनेक उत्तम कल्पना असतात. त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घ्यायला हवे. कन्सासप्रमाणेच व्हरमॉन्ट व मॅसॅच्युसेटट्स या राज्यांमध्येही निवडणुकीला उभे राहाण्यासाठी उमेदवाराला कोणतीही वयोमर्यादा कायद्याने घालण्यात आलेली
नाही. (वृत्तसंस्था)
कायदा दुरुस्तीचा विचार-
1कन्सास राज्यातील लोकप्रतिनिधी चिंतेत पडले आहेत. निवडणुकीला उभे राहाण्यासाठी उमेदवाराचे नाव मतदारयादीत असणे आवश्यक असावे तसेच त्याने किमान चार वर्षे तरी कन्सास राज्यामध्ये वास्तव्य केलेले असावे, अशा दोन दुरुस्त्या विद्यमान निवडणुक कायद्यामध्ये करण्याचा विचार लोकप्रतिनिधींनी सुरु केला आहे.
2मात्र हे दुरुस्ती विधेयक पुढील वर्षी जानेवारी महिन्यातच कन्सासच्या लोकप्रतिनिधीगृहात मांडता येऊ शकते. गव्हर्नरपदाची निवडणुक त्याआधीच होऊन जाईल. त्यामुळे विलक्षण पेचप्रसंग निर्माण होऊ
शकतो.