चीनमध्ये सहा आठवड्यांनंतर मोठ्या संख्येने सापडले नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:27 AM2020-04-14T05:27:36+5:302020-04-14T05:28:07+5:30
विदेशातून परतलेल्यांकडून संसर्ग; चिंतेत आणखी भर
बीजिंग : चीनमध्ये सहा आठवड्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामध्ये विदेशातून चीनमध्ये परतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. या नागरिकांकडून होणाऱ्या संसर्गामुळे आता चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले. याआधी सहा आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी चीनमध्ये एकाच दिवसात
कोरोनाचे १४३ नवे रुग्ण आढळले होते. या देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ८२ हजारांवर पोहोचली असून ३,३४१ जण मरण पावले आहेत.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी सांगितले की, रविवारी कोरोनाच्या आढळलेल्या १०८ नव्या रुग्णांपैकी ९८ जण विदेशवारीहून चीनमध्ये परतले आहेत. या देशात कोरोना साथीच्या रुग्णांच्या संख्येत फेब्रुवारीमध्ये घट झाली होती. मात्र, या साथीचा जागतिक स्तरावर फैलाव झाल्यानंतर चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मार्चमध्ये पुन्हा वाढ दिसून आली. आता या साथीची दुसरी फेरी चीनमध्ये सुरू आहे. (वृत्तसंस्था)
२८ दिवस क्वारंटाईनमध्ये
रशियाच्या सीमेला लागून असलेल्या
चीनच्या हेलाँगजिआंग प्रांतामध्ये कोरोनाचे
५६ रुग्ण आढळले आहेत. सुईफेन्हे हे सीमावर्ती शहर व हेलाँगजिआंग या
प्रांताची राजधानी हर्बिन येथे विदेशातून आलेल्यांना २८ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा रुग्ण आढळून आलेल्या वसाहतींमध्ये १४ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय हर्बिन शहर प्रशासनाने घेतला आहे.