झोपेत प्रसूती
By admin | Published: February 9, 2017 01:53 AM2017-02-09T01:53:44+5:302017-02-09T01:53:44+5:30
आई बनणे ही सुखद जाणीव आणि तेवढीच वेदनादायी प्रक्रिया आहे. अनेक महिला प्रसववेदना नको म्हणून सिझेरियनद्वारे प्रसूतीचा पर्याय निवडतात.
लंडन : आई बनणे ही सुखद जाणीव आणि तेवढीच वेदनादायी प्रक्रिया आहे. अनेक महिला प्रसववेदना नको म्हणून सिझेरियनद्वारे प्रसूतीचा पर्याय निवडतात. मात्र, एका महिलेने प्रसूतीवेदनेविना झोपेतच बाळाला जन्म दिल्याची अनोखी घटना अॅशबोर्न, डर्बिशायर (ब्रिटन) येथे घडली. एलिस पायने (२३) ही झोपेत असताना बाळ तिच्या पोटात होते आणि पूर्ण जाग आली, तेव्हा कुशीत. या घटनेचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. एलिस झोपेचे औषध घेऊन झोपली होती. तेव्हाच प्रसूती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, डिटेक्शन यंत्राला ते हेरता आले नाही. एलिस झोपेत असल्यामुळे तिची प्रसूती नैसर्गिकरीत्या होईल, याबाबत डॉक्टर साशंक होते, त्यामुळे त्यांनी सिझेरियनचा निर्णय घेतला. तथापि, पती जॉन यांनी झोपेतील पत्नीला जोर लावण्यासाठी प्रोत्साहित केले. परिचयाच्या आवाजाने एलिसला अर्धवट जाग आली. पेंगुळल्या अवस्थेत तिने जॉन सांगेल त्याप्रमाणे आतून दाब देणे सुरू केले आणि त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मानंतर एलिस पुन्हा गाढ झोपी गेली. त्यानंतर, दोन तासांनी तिला जाग आली. एलिस खासगी शिकवणी घेते, तर जॉन सुरक्षारक्षक आहेत. त्यांनी आपल्या बाळाचे नाव फिलीप ठेवले आहे. बाळ आणि बाळंतीण दोन्हीही सुखरूप आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. या महिलेला प्रसूतीदरम्यान कोणतीही वेदना झाली नाही. असा प्रकार पहिल्यांदाच घडला, असे रुग्णालयातील परिचारिकेने सांगितले.