स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 08:17 PM2024-05-15T20:17:52+5:302024-05-15T20:19:17+5:30
Slovakia PM Robert Fico injured in shooting : सध्या पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे वृत्त आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान रॉबर्ट फिको हे जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांना मारण्यासाठी अनेक राऊंड फायर केले. सध्या पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितानुसार, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना ज्या प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या त्याचप्रमाणे स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर एक जण होता की अनेक होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या प्रकृतीबाबत सुद्धा अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, तो हल्लेखोर आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही.
चौथ्यांदा पंतप्रधानपदी
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी निवडून आले होते. ते 22.94 टक्के मतांनी विजयी झाले होते. स्लोव्हाकियाच्या हितांना प्राधान्य देण्याचे आणि युक्रेनला मिळणारी लष्करी मदत कमी करण्याचे आश्वासन देऊन रॉबर्ट फिको यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तसेच, रॉबर्ट फिको हे पुतीन यांच्या जवळचे मानले जातात.
पूर्व युरोपमध्ये असलेला देश स्लोव्हाकिया
स्लोव्हाकिया हा पूर्व युरोपमधील एक देश आहे. हा देश सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. म्हणजेच हा असा देश आहे, ज्याच्या सीमा समुद्राला मिळत नाहीत. या देशाचे क्षेत्रफळ अंदाजे 50 हजार चौरस किलोमीटर आहे. स्लोव्हाकियाच्या पूर्वेस युक्रेन, पश्चिमेस झेक प्रजासत्ताक, उत्तरेस पोलंड आणि दक्षिणेस हंगेरी आहे.