केबिनमधून धुराचा अलर्ट जारी झाला होता...
By admin | Published: May 22, 2016 02:52 AM2016-05-22T02:52:50+5:302016-05-22T02:52:50+5:30
इजिप्त एअरचे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेले विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधून धुराचा अलर्ट चालू झाला होता, अशी आता नवीन माहिती उघड झाली आहे.
कैरो : इजिप्त एअरचे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेले विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधून धुराचा अलर्ट चालू झाला होता, अशी आता नवीन माहिती उघड झाली आहे. पॅरिसहून कैरोला जाणाऱ्या या विमानात ६६ प्रवासी
होते त्यापैकी कोणीही वाचले जाण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांच्या मृतदेहाचे काही भाग, त्यांचे सामान आणि विमानाची आसने मिळाल्यानंतर काही वेळातच ही नवीन माहिती जाहीर झाली. या विमानाचा ब्लॅकबॉक्स मात्र अद्याप सापडला नाही. हवाई उद्योगाची वेबसाईट ‘एव्हिएशन हेरॉल्ड’वर जारी डेटाच्या अनुसार सिग्नल गायब होण्याच्या काही मिनिटे अगोदर शौचालय व विमानाच्या वीज उपकरणातून धूर निघाला होता. एअर क्राफ्ट कम्युनिकेशन्स अॅण्ड रिपोर्टिंग सिस्टिमच्या (एसीएआरएस) उड्डाणासंबंधी डेटातून ही माहिती मिळाली आहे, असे या वेबसाईटने म्हटले आहे.
वेबसाईटने जारी केलेल्या या माहितीला अधिकाऱ्यांनी मात्र दुजोरा दिलेला नाही. या घटनेमागे दहशतवादी हात असल्याची शक्यताही फेटाळण्यात येत नाही. ‘हेरॉल्ड’ने म्हटले आहे की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार दोन वाजून २६ मिनिटांनी एअर बस ए-३२० च्या शौचालयातून धूर निघाल्याचे दिसते. त्यानंतर एक मिनिटातच संबंधित अलर्ट जारी करण्यात आला.