ऐकावं ते नवलंच! सौदी अरेबियात पहिल्यांदाच पडला बर्फ, दृष्य पाहून स्थानिकांना बसला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:26 PM2024-11-05T16:26:43+5:302024-11-05T16:28:47+5:30
सौदी अरेबियातील वाळवंटी प्रदेशात चक्क बर्फवृष्टी झाली आहे.
Snowfall in Saudi Arabia : पृथ्वीच्या वातावरणात गेल्या काही काळापासून अनैसर्गिक बदल पाहायला मिळत आहेत. यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता ताजे उदाहरण सौदी अरेबियातून समोर आले आहे. सौदी अरेबियातील वाळवंटी प्रदेशात पहिल्यांदाच चक्क मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव झाला आहे. अल-जौफ प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे स्थानिकांसह तज्ञांनाही चकीत केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल-जौफ भागातील लोक नेहमीप्रमाणे सकाळी उठले, पण समोर बर्फाची चादर पसरलेली पाहून त्यांना आश्चर्ययाचा धक्का बसला. सौदी प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, येथे फक्त हिमवर्षाव झाला नाही, तर अनेक ठिकाणी धबधबेदेखील तयार झाले आहेत. यामुळे या परिसरातील अनेक खोऱ्यांचे पुनरुज्जीवन झाले असून, संपूर्ण परिसरात गारवा पसरला आहे.
📹 Incredible: Snow Blankets Parts of Saudi Arabia After Heavy Rain & Hail pic.twitter.com/mhn3VHHe5D
— RT_India (@RT_India_news) November 4, 2024
येत्या काही दिवसात हवामान खराब होणार आहे
मात्र, सौदीच्या हवामान खात्याने येत्या काही दिवसांत खराब हवामान कायम राहण्याचा इशारा दिला आहे. अल-जौफमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, पुढील मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे दृश्यमानताही कमी होऊ शकते. या वादळासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यापूर्वी अशी घटना घडलेली
असामान्य हवामानाचा अनुभव घेणारा सौदी अरेबिया हा एकमेव देश नाही. याआधी संयुक्त अरब अमिराती (UAE) देखील अशाच प्रकारच्या हवामान बदलातून गेला आहे. 14 ऑक्टोबर रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने (NCM) अनेक भागात अपेक्षित पाऊस, वादळ आणि गारपिटीच्या शक्यतेबाबत इशारा जारी केला होता. UAE हवामान खात्याने या बदलांचे कारण अरबी समुद्रापासून ओमानच्या दिशेने पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला दिले, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील हवामानावर परिणाम झाला.