Snowfall in Pakistan: बर्फवृष्टीत पर्यटकांची 1000 वाहने अडकली; 10 मुलांसह 21 जणांचा मृत्यू, दहा जण कारमध्येच गोठले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 12:52 PM2022-01-09T12:52:19+5:302022-01-09T12:52:28+5:30
Snowfall in Pakistan: पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरीच्या डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहने रस्त्यांच्या मधोमध अडकली असून, यात हजारो पर्यटक आपला जीव मुठीत धरुन मदतीची वाट पाहत आहेत. कारमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे वेदनादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इस्लामाबाद:पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरीच्या डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहने रस्त्यांच्या मधोमध अडकली असून, यात हजारो पर्यटक आपला जीव मुठीत धरुन मदतीची वाट पाहत आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, शनिवारी या वाहनांमध्ये अडकलेल्यांपैकी 10 मुलांसह किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी किमान 10 जणांचा कारमध्ये बसून गोठल्याने मृत्यू झाला आहे. कारमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा एक वेदनादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचाही समावेश आहे. यात पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी आणि 6 मुले आहेत. आणखी एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. उस्मान अब्बासी या पर्यटकाने फोनवर सांगितले की, लोकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या बर्फाशी केवळ पर्यटकच झुंज देत नाहीत, तर स्थानिक नागरिकांची वाहनेही पर्यटकांच्या वाहनांच्या जॅममध्ये अडकली आहेत.
पाकिस्तानी गृहमंत्री म्हणाले- एक लाखाहून अधिक वाहने आली
हे सर्व पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते, मात्र शनिवारी परतत असताना रस्त्यावरच अडकले, असे अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानचे गृह मंत्री शेख रशीद यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटीश वसाहत असलेल्या मुरी शहरात गेल्या काही दिवसांत 1 लाखाहून अधिक पर्यटक वाहने आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी, रावळपिंडीच्या उपायुक्तांनी सोशल मीडियावर 23,000 वाहनांमधून लोकांची सुटका केल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 फूट बर्फवृष्टी झाली असून शेकडो झाडे पडल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत.
लष्कराचे बचाव कार्य सुरू
मुरी परिसर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेस स्थित असून, समुद्रसपाटीपासून सुमारे 7500 फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे पर्यटन स्थळ आहे. 19व्या शतकात ब्रिटीश सैन्याने त्यांचा वैद्यकीय तळ म्हणून या परिसराला घोषित केले होते. डोंगराळ भाग आणि बर्फवृष्ठीमुळे दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. सध्या या भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासठी लष्कर मोठ्या प्रमाणात बचाव अभियान राबवत आहे. पण, डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
स्थानिक लोकांनी ब्लँकेट आणि अन्न दिले
बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर थंडीशी झुंज देत असलेल्या पर्यटकांना परिसरातील सरकारी इमारती आणि शाळांमध्ये हलवण्यात येत आहे. तिथे अनेक स्थानिक लोक पर्यटकांना ब्लँकेट आणि अन्न पुरवत आहेत. सध्या इस्लामाबाद आणि इतर भागातून मुरीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याचे गृहमंत्री शेख रशीद यांनी सांगितले. रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत हे रस्ते बंद राहणार आहेत. पंजाब सरकारने मुरीमध्ये 'स्नो इमर्जन्सी' जाहीर केली आहे. हा परिसर आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणूनही घोषित करण्यात आला आहे.