सन् न् न्... ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने स्टेजवरच ॲंकरच्या कानाखाली खेचली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:33 AM2022-03-29T08:33:01+5:302022-03-29T08:33:39+5:30
विल स्मिथची पत्नी जेदा पिंकेट गेल्या काही वर्षांपासून एका व्याधीने ग्रस्त आहे
लॉस एंजेलिस : जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी ऑस्करचा पुरस्कार सोहळा म्हणजे पर्वणी असतो. सोहळ्याचा सूत्रसंचालक कधी शाब्दिक कोट्या करत तर कधी विनोदी कोपरखळ्या मारत सोहळ्याचे वातावरण हलकेफुलके ठेवतो. मात्र, सोमवारी झालेला पुरस्कार सोहळा या सगळ्याला अपवाद ठरला. प्रख्यात अभिनेता विल स्मिथ याने थेट रंगमंचावर जाऊन सूत्रसंचालकाची भूमिका वठवत असलेला विनोदवीर ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात लगावली अन् जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक अवाक् झाले. पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने संतापाच्या भरात विलने ही कृती केली.
विल स्मिथची पत्नी जेदा पिंकेट गेल्या काही वर्षांपासून एका व्याधीने ग्रस्त आहे. या व्याधीत तिचे डोक्यावरील केस गळत असल्याने तिने पूर्णत: टक्कल केले आहे. हाच धागा पकडून ख्रिस रॉक याने बोलण्याच्या ओघात जेदा पिंकेटवर टिप्पणी करत ९०च्या दशकात गाजलेल्या ‘जीआय जेन’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेचा उल्लेख केला.
n ‘जीआय जेन२’ हा चित्रपट आला तर त्याची नायिका जेदा हीच असेल, असे ख्रिस म्हणाला.
n पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतापलेल्या विलने थेट रंगमंचावर धाव घेत ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली.
n हा प्रकार एवढा झटपट घडला की उपस्थित प्रेक्षकही स्मिथच्या या कृतीने अवाक् झाले. जागेवर परतल्यानंतरही स्मिथने अर्वाच्य भाषेत ख्रिस रॉकला समज दिली.
‘किंग रिचर्ड’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल ऑस्कर मिळाल्यानंतर भावूक झालेल्या विल स्मिथने आपल्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल माफी मागितली.
ख्रिस रॉकनेही आपण पुन्हा असे बोलणार नाही, असे सांगत स्मिथची माफी मागितली.
ऑस्कर गोज टू...
n सर्वोत्कृष्ट चित्रपट : कोडा
n सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट
ओरिजनल स्कोर, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन
डिझाइन, सर्वोत्कृष्ट साऊंड, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ड्यून
n सर्वोत्कृष्ट अभिनेता :
विल स्मिथ (चित्रपट : किंग रिचर्ड)
n सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसिका चेस्टेन
(चित्रपट : दि आईज ऑफ टॅमी फाये)
n सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :
जेन कॅम्पियन (चित्रपट : दि पॉवर ऑफ दि डॉग)
अकादमीला लता मंगेशकर, दिलीपकुमार यांचे विस्मरण
दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर व दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांची नावे ऑस्कर चित्रपट सोहळ्यातील ‘इन मेमोरियम’ या विभागात समाविष्ट न केल्याने भारतीय रसिकांची निराशा झाली.