...तर ९० टक्के मुले जगणार नाहीत; गरीब देशांमध्ये कॅन्सरमुळे हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 09:53 AM2023-09-23T09:53:15+5:302023-09-23T09:53:32+5:30
गरीब देशांमध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वर्षे वयोगटातील ४५ टक्के मुले योग्य उपचार न मिळाल्याने किंवा उपचारातील गुंतागुंतीमुळे मरण पावतात.
नवी दिल्ली : कर्करोगावर योग्य उपचार न मिळाल्याने गरीब देशांमध्ये दर १५ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. लॅन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
गरीब देशांमध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वर्षे वयोगटातील ४५ टक्के मुले योग्य उपचार न मिळाल्याने किंवा उपचारातील गुंतागुंतीमुळे मरण पावतात. विकसित देशांमध्ये हा आकडा ३ ते ५ टक्के आहे. अहवालानुसार, कर्करोगाने ग्रस्त ९० टक्के मुले गरीब देशांमध्ये राहतात. येथे त्यांची जगण्याची शक्यता २० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
कुपोषण एक कारण
गरीब देशांमध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. मुलांना पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहते.
यामुळे शरीर कर्करोगाशी लढण्यास सक्षम नसते. यूएन अहवालानुसार २०२२ मध्ये ५ वर्षांखालील ४.५ कोटी मुले कुपोषणाला बळी पडले आहेत.
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
जगभरात दरवर्षी सुमारे एक कोटी लोक कर्करोगामुळे जीव गमावतात. धक्कादायक म्हणजे २०१० च्या तुलनेत २०१९ मध्ये कर्करोगामुळे सुमारे २१ टक्के अधिक मृत्यू झाले. २०१९ मध्ये कर्करोगाने एक कोटी लोकांचा मृत्यू झाला. सुमारे एक तृतीयांश कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात. सिगारेट, गुटखा कोणत्याही स्वरूपातील तंबाखू आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. हल्ली सुमारे ८० टक्के फुप्फुसाचा कर्करोग धूम्रपानामुळे होतो.