..तर अमेरिकेची युद्धनौका एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू
By admin | Published: April 23, 2017 04:08 PM2017-04-23T16:08:56+5:302017-04-23T16:47:10+5:30
अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सनला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू, अशी धमकी उत्तर कोरियानं दिली आहे
ऑनलाइन लोकमत
स्योल, दि. 23 - उत्तर कोरियाला अमेरिकेनं चहूबाजूंनी घेरलं असतानाही उत्तर कोरियाची युद्धाची खुमखुमी काही जाता जात नाही. अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सनला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू, अशी धमकी उत्तर कोरियानं दिली आहे, असं वृत्त सत्ताधारी वर्कर पक्षाच्या मुखपत्रातून छापून आलं आहे. आमची सेना अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका समुद्रात डुबवण्यास सज्ज आहे, असा इशारा उत्तर कोरियानं अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर कोरियातील सत्ताधारी वर्कर पक्षाच्या मुखपत्रातून अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात अमेरिकेच्या यूएसएस कार्ल विन्सन या युद्धनौकेची तुलना एका दृष्ट जनावराशी करण्यात आली आहे. आमची क्रांतिकारी सेना अणुऊर्जेवर चालणा-या अमेरिकेच्या युद्धनौकेला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करण्यासाठी तयार आहे. जगाला आमच्या सेनेची ताकद दाखवण्यासाठी हीच चांगली संधी आहे, असंही या लेखात म्हटलं आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन हे गेल्या वर्षीच दोन अणुचाचण्या करून मोकळे झाले आहेत. किम जोंग ऊन यांच्या नेतृत्वात अमेरिकेपर्यंत मारा करू शकणा-या मिसाईल्सही विकसित केल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही उत्तर कोरियाशी संघर्ष करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. उत्तर कोरियाला कोणत्याही परिस्थितीत अणुचाचणी करायला देणार नाही, असंही अमेरिकेनं ठणकावलं आहे.
अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सन स्वतःच्या सैन्यासह प्रशांत महासागरात कोरियन द्विपकल्पातून उत्तर कोरियाच्या दिशेनं जलद रितीनं कूच करत आहे. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर युद्धनौकेला उत्तर कोरियाच्या जवळ जाण्याचा आदेश दिला आहे. आमची युद्धनौका पुढच्या काही दिवसांत स्वतःच्या उद्देशापर्यंत पोहोचेल, असंही अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स म्हणाले आहेत. अमेरिकेच्या कार्ल विन्सनच्या युद्ध सरावासाठी जपाननंही दोनही युद्धनौका पाठवल्या आहेत. उत्तर कोरियानं अमेरिकेसह दक्षिण कोरिया आणि जपानही युद्धाची धमकी दिली आहे. दुस-या महायुद्धानंतर जपानचं सैन्य अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार नाही. मात्र उत्तर कोरियाच्या अणुचाचण्यानंतर त्यांना प्रतिबंध करणा-या शस्त्रास्त्रांची मागणी जपाननं केली आहे. उत्तर कोरिया येत्या काही दिवसांत अणुचाचणी घेणार असल्याची दक्षिण कोरियाला शंका आहे. त्यामुळे दक्षिण कोरियानं स्वतःच्या सैन्यालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.