आतापर्यंत ५ वेळा विमान पाडले
By admin | Published: July 18, 2014 11:10 PM2014-07-18T23:10:35+5:302014-07-18T23:10:35+5:30
युक्रेनच्या हवाई हद्दीत मलेशियन विमान क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
युक्रेनच्या हवाई हद्दीत मलेशियन विमान क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे अशा प्रकारच्या अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आतापर्यंत जगभरात पाच वेळा प्रवासी विमानांना लक्ष्य करून पाडण्यात आले.
> ०४ आॅक्टोबर २००१ : सायबेरियन एअरलाईन्सचे एक विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून रशियाच्या नोवोसिबिर्स्कसाठी रवाना झाले होते. या विमानाला खाली पाडण्यात आले होते. विमान काळ्या समुद्रात कोसळून झालेल्या अपघातात ७८ जण मारले गेले होते. सुरुवातीला युक्रेनच्या सैन्याने या घातपातामागे आपला हात नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र नंतर युक्रेनने मान्य केले की, सैन्य अभ्यासादरम्यान चुकून विमानाला लक्ष्य करण्यात आले.
2 ०३ जुलै १९८८ : इराण एअरलाईन्सचे दुबईला जाणारे एअरबस ए ३०० विमान सौदीच्या हवाई हद्दीत एफ-१४ नामक युद्धविमान समजून पाडण्यात आले होते. १९७९ च्या इराण क्रांतीपूर्वी हे युद्धविमान इराणला विकण्यात आले होते. अमेरिकी युद्धजहाजाने इराणच्या या विमानावर दोन क्षेपणास्त्रे डागल्याने त्यातील सर्व २९० प्रवासी मारले गेले.
> ०१ सप्टेंबर १९८३ : न्यूयॉर्कहून सोलकडे जाणारे कोरियन एअरलाईन्सचे प्रवासी विमान तत्कालीन सोव्हिएत संघाने एका युद्धविमानाद्वारे पाडले होते. यातील सर्व २६९ प्रवासी मृत्युमुखी पडले. या विमानाने आपला मार्ग बदलून ते सोव्हिएत हद्दीत घुसले होते. सुरुवातील सोव्हिएत संघाने या घटनेमागे आपला हात नसल्याचा दावा केला होता; मात्र नंतर हे विमान हेरगिरी करीत असल्याचा दावा करीत यामागे आपला हात असल्याचे मान्य केले.
> २१ फेब्रुवारी १९७३ : इस्रायलच्या युद्धविमानांनी लिबियन एअरलाईन्सचे बोर्इंग ७२७-२०० विमान इजिप्तच्या सिनाई भागात पाडले होते. खराब हवामान आणि दिशादर्शकात बिघाड झाल्याने पायलटचा मार्ग चुकून हे विमान इस्रायलच्या हवाई हद्दीत भरकटले होते. यात १३ जण दगावले होते, तर ५ जण बचावले.
> २३ जुलै १९५४ : कॅथे पॅसिफिक एअरवेजचे सी-५४ स्काईमास्टर विमान बँकॉकहून हाँगकाँगला रवाना झाले होते. हैनान बंदराच्या किनारी भागात चिनी युद्धविमानांनी यास लक्ष्य केले होते. लष्करी कारवाईविरोधात आलेले सैन्य विमान समजून हा हल्ला केल्याचा चीनने दावा केला होता.