म्हणून जिनपिंग सरकार लपवतेय गलवानमधील मृत सैनिकांचा आकडा, CCPच्या निकटवर्तीयाने केला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:48 PM2020-07-01T15:48:21+5:302020-07-01T15:48:49+5:30
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक झटापट होऊन त्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनच्याही ४३ हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला होता. मात्र चीन सरकार आणि सैन्याने या झटापटीत झालेल्या मनुष्यहानीची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
बीजिंग - चिनी सैन्य सध्या लडाखमध्येभारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असून, त्यामुळे लडाखच्या सीमेवर चीन आणि भारताच्या सैन्यामध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये १५ आणि १६ जूनदरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक झटापट होऊन त्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनच्याही ४३ हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला होता. मात्र चीन सरकार आणि सैन्याने या झटापटीत झालेल्या मनुष्यहानीची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. दरम्यान, चीन सरकारकडून गलवानमधील मृत सैनिकांची आकडेवारी जाहीर करण्याबाबत करण्यात येत असलेल्या टाळाटाळीबाबत चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याच्या मुलाने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र आणि सिटिझन पॉवर इनिशिटिव्ह फॉर चीनचे संस्थापक अध्यक्ष जियानली यांग यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या स्तंभामधून गलवानमधील मृतांच्या आकड्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या स्तंभात ते म्हणतात की, गलवानमध्ये झालेल्या संघर्षात सैनिक मारले गेले ही बाब मान्य केली तर चिनी लष्करामध्ये उठाव होऊ शकतो, अशी भीती चीन सरकारला वाटत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी दीर्घकाळापासून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या शक्तीचा आधारस्तंभ राहिली आहे. जर वर्तमान काळात पीएलएमध्ये कार्यरत असलेल्या कॅडरच्या भावना दुखावल्या गेल्या तर ते लाखो माजी सैनिकांसोबत उभे राहतात. हे माजी सैनिका आधीपासूनच जिनपिंग यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे हे आजीमाजी सैनिक एकत्र आल्यास जिनपिंग यांना आव्हान देण्याइतपत शक्तिशाली ताकद बनू शकतात.
यांग पुढे लिहितात की, सीपीपीचे नेतृत्व माजी सैनिकांच्या सशत्र कारवाई सुरू करण्याच्या जोखमीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे दबाव आणि नोकरशाहीच्या उपाययोजनांनंतरही माजी सैनिकांकडून विरोध होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही बाब शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाची चिंता वाढवणारी आहे.
याबाबत जियानली यांग यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीचेही उदाहरण दिले आहे. त्यात ते म्हणतात की, या हिंसक झटापटीत दोन्हीकडच्या सैन्याचे नुकसान झाले आहे. मात्र ही झटापट झाल्यानंतर चीन सरकारने या झटापटीत मारल्या गेलेल्या सैनिकांची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिलेला आहे. तर दुसरीकडे भारताने आपल्या हुतात्मा जवानांना संपूर्ण सन्मानासहीत निरोप दिला आहे. चीन सरकारकडून मृत सैनिकांची माहिती उघड न करण्यामागे पीएलएच्या ५.७ कोटी माजी सैनिकांच्या मनात धुमसत असलेला संताप आहे, असेही जियानली यांग यांनी सांगितले.