..तर पालकांना दहा वर्षे कोठडी, दोन कोटी दंड! जाणून घ्या काय आहे साैदीतील प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 08:36 AM2021-06-16T08:36:34+5:302021-06-16T08:36:51+5:30
अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हामुळे लोक त्रस्त झाले आहेत; आणि सरकारही वैतागलं आहे. मात्र सरकारच्या या वैतागाचं कारण वेगळंच आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या उन्हानं कहर माजवला आहे. तापमान सातत्यानं ५० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी तर पारा थेट ५१.८ अंशांवर गेला होता. अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधलं आतापर्यंतचं हे सर्वोच्च तापमान नव्हे. याआधी जुलै २००२मध्ये पारा ५२.१ अंशावर पोहोचला होता. मात्र गेल्या आठवड्यात दोनदा पारा ५१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला होता. असं पहिल्यांदाच घडलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जून ते ऑगस्ट हा सर्वोच्च तापमानाचा काळ सममजला जातो. या वर्षी आताच तापमान बऱ्याचदा ५० अंशाच्या पुढे गेल्यानं या वर्षाची नोंद ‘आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हामुळे लोक त्रस्त झाले आहेत; आणि सरकारही वैतागलं आहे. मात्र सरकारच्या या वैतागाचं कारण वेगळंच आहे. कारण या उन्हामुळे दरवर्षी अनेक लहान मुलं मृत्युमुखी पडतात, पण त्याला कारणीभूत मात्र त्यांचे पालकच असतात. बऱ्याचदा पालक कार घेऊन घराबाहेर पडतात, आपलं मूल जर झोपलेलं असलं, तर ‘त्याला कशाला उन्हाचा त्रास द्या’ म्हणून ते गाडीतच त्याला झोपू देतात. पण काम आटोपून परत आल्यावर पाहातात तो घुसमटल्यामुळे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुलाचा जीव गेलेला! अशा घटना संयुक्त अरब अमिरातीत नव्या नाहीत. दरवर्षी अनेक मुलांचा जीव या एका कारणामुळे जातो. त्यामुळे सरकारनंही आता यावर कठोर व्हायचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार कारमध्ये मुलाला तसंच एकटं सोडून जाणाऱ्या निष्काळजी पालकांना आता मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. लहान मुलांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक हक्क जपण्यासाठी ‘चिल्ड्रेन्स राइट्स लॉ’ अंतर्गत सरकारनं दोषी पालकांना तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख दिरहमपर्यंत (सुमारे दोन कोटी रुपये) दंडाची शिक्षा जाहीर केली आहे.
यासंदर्भात आरोग्य आणि सार्वजनिक संरक्षण मंत्रालयाचे फॅमिली मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. अदेल सइद सजवानी यांचं म्हणणं आहे, “मुलांना पार्क केलेल्या गाड्यांमध्ये सोडून देणं ही घटना जगभरातल्या पालकांमध्ये घडते. मुलांना कारमध्ये एकटं सोडल्यामुळे असे काही घडू शकेल याची त्यांनाही कल्पना नसते. एकट्या अमेरिकेत दरवर्षी सुमारे पन्नास मुलं या घटनेमुळं मरण पावतात. काही पालकांना तर तशी सवयच जडून गेेलेली असते. मोठे कुटुंब असलेल्या लोकांच्या बाबतीतही बऱ्याचदा ही घटना घडते. कोणीतरी मुलाला बरोबर घेईल किंवा घेतलेलं असेल या भरवश्यानं कुटुंबीय गाडीतून उतरून जातात आणि झोपलेलं मूल गाडीत मागच्या सीटवर तसंच राहतं. ते त्याच्या जीवावर बेतू शकतं. अर्थात मुलाला त्रास होऊ नये या सदिच्छेनेच त्यांनी मुलाला कारमध्ये ठेवलेलं असतं. पण हळूहळू ही सवय अंगवळणी पडत जाते. मुलाला कारमध्येच विसरून जाणाऱ्या लोकांचं प्रमाण जगभरात जवळपास ५५ टक्के इतकं प्रचंड आहे. यामुळे मुलाच्या जीवाला काही अपाय होईल अशी पुसटशी शंकाही त्यांना आलेली नसते.”
यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीच्या पोलिसांनीही कडक भूमिका घेतली असून, कारमध्ये मुलांना एकटं सोडून जाणाऱ्या पालकांची, कुटुंबीयांची शोधमोहीमच त्यांनी सुरू केली आहे. त्याबरोबरच रस्त्यावरील कार्सची तपासणीही सुरू केली आहे. ज्या गाड्यांचे टायर जीर्ण झालेले आहेत, ज्यामुळे अपघात होऊ शकतो, अशा गाड्यांच्या चालकांना तंबी देणं आणि प्रसंगी त्यांना दंड करणंही पोलिसांनी सुरू केलं आहे.
‘सईद असोसिएशन’ या संस्थेचे कार्यकारी संचालक आणि ट्रॅफिक एक्स्पर्ट जमाल अल अमारी हे रस्ते अपघातांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून काम करताहेत. त्यांचं म्हणणं आहे, “पालकांनी मुलांना कारमध्ये एकटं सोडून जाणं म्हणजे त्यांचा जीव धोक्यात टाकण्यासारखंच आहे. कारमधून उतरल्याबरोबर मुलांना सोबत घेणं ही पालकांची जबाबदारी आहे. एका छोट्याशा चुकीमुळे बालकांचा प्राण जाऊ शकतो. विशेषत: बाहेर रस्त्यावर तुम्ही कार घेऊन जाता, त्या वेळी ही खबरदारी घेणं जास्त आवश्यक आहे.”
यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीचं तापमान एवढं नव्हतं. अगदी ७० च्या दशकापर्यंत तिथलं तापमान नॉर्मल होतं आणि उन्हाळ्यातही गारवा असायचा, बऱ्याचदा थंडीही वाजायची, असं जाणकारांचं आणि काही ज्येष्ठांचं म्हणणं आहे.
दहा मिनिटांत तापमान ४०वरून ६०वर!
‘अरब युनियन ऑफ ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड स्पेस सायन्सेस’ या संस्थेचे शास्त्रज्ञ अल जर्वान म्हणतात, ‘अरेबियन द्वीपकल्पात मे ते ऑगस्ट विशेषत: जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत अतिशय कडक उन्हाळा असतो. बाहेरचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस असलं तरी उष्णतेमुळे बंद कारमधील तापमान केवळ दहा मिनिटांतच साठ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. मूल जर अशा बंद कारमध्ये जास्त वेळ राहिलं तर गुदमरल्यामुळे, उष्माघातामुळे किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मुलांना कारमध्ये एकटं सोडण्याआधी किमान दहादा तरी पालकांनी विचार करावा.’