’एशियान’च्या बैठकीत भेटले मोदी आणि ट्रम्प, भारताच्या कौतुकासाठी मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 03:48 PM2017-11-13T15:48:18+5:302017-11-13T15:56:03+5:30
मनिला येथे सुरू असलेल्या ’एशियान’ शिखर संमेलानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.
मनिला - येथे सुरू असलेल्या ’एशियान’ शिखर संमेलानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात आशियाई देशांचे भविष्य आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका मिळून संपूर्ण जगाचे भविष्य बदलू शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताच्या केलेल्या कौतुकासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले.
आशियाई शिखर परिषदेतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या सहा महिन्यांमधील मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमधून ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेसाठी चीनपेक्षा कमी महत्त्वपूर्ण नसल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने सुधारले आहेत. विशेषकरून चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील युतीमधून त्याचे संकेत मिळत आहेत.
त्याआधी ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी मोदींची स्तुती केली होती. मोदींनी भारतातील सगळ्या लोकांना एकत्र आणले आहे. तसेच भारतातील विकासाचा वेगही वाढला आहे, असे ट्रम्प म्हणाले होते.
तत्पूर्वी ’एशियान’ संघटनेच्या ५0 व्या वर्षानिमित्त आयोजित मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची अल्पकाळ उभ्याउभ्या भेट घेऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
‘एशियान’ शिखर परिषद व अनुषंगिक बैठकांसाठी आलेल्या सदस्य देशांच्या नेत्यांसाठी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोनल्डो द्दय़ुतेर्ते यांनी स्वागत समारंभ आयोजित केला होता. सर्व पाहुण्या नेत्यांनी फिलिपीन्सचा राष्ट्रीय पेहराव असलेला, फिकट पिवळ्य़ा रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ‘बाराँग तगलाँग’ हा शर्ट परिधान केला होता. या वेळी जमलेल्या नेत्यांच्या मांदियाळीत फेरपटका मारून मोदी यांनी शिन्जो अबे (जपान), दिमित्री मेदवेदेव (रशिया) व नजिब रझाक (मलेशिया) या पंतप्रधानांशीही गप्पागोष्टी केल्या.