...म्हणून ट्रम्पना उत्तर कोरियाचा विषय कायमचा संपवायचाय
By admin | Published: April 25, 2017 05:05 PM2017-04-25T17:05:52+5:302017-04-25T17:06:16+5:30
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी उत्तरकोरियाला धमकी दिलीय पण कधी थेट कारवाई केलेली नाही. उत्तरकोरियाचाही शक्तीशाली बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या करुन...
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 25 - उत्तरकोरियाची घातक शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता वाढत चालल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळेच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला उत्तरकोरियाचा अणवस्त्राचा प्रश्न लवकर निकाली काढण्याची घाई झाली आहे. गुप्तचरांकडून अमेरिकेला जे अहवाल मिळालेत त्यानुसार दर सहा ते सात आठवडयाला एका अणूबॉम्बची निर्मिती करण्याची क्षमता उत्तरकोरियामध्ये आहे.
उत्तरकोरियाचा अणवस्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तज्ञांना पाहणीसाठी खुला नसल्याने नेमके त्यांच्या क्षमतेचे मुल्यमापन करणे एक आव्हान आहे. अमेरिकेचा जो अंदाज आहे त्यापेक्षा जास्त गती उत्तरकोरियाकडे असेल तर ती धोक्याची घंटा असल्याने ट्रम्प प्रशासनातील अधिका-यांचे मत आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियाचा विषय निकाली काढण्याची घाई झाली आहे.
यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी उत्तरकोरियाला धमकी दिलीय पण कधी थेट कारवाई केलेली नाही. उत्तरकोरियाचाही शक्तीशाली बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या करुन अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न असतो. उत्तरकोरियाने आता आणखी एक अणवस्त्र चाचणीची धमकी दिली असून, 11 वर्षातील ही सहावी चाचणी असेल.
उत्तरकोरियाने अशी चाचणी केल्यास अमेरिकेकडून आणखी कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात. ट्रम्प यांनी अलीकडेच रासायनिक हल्ल्यासाठी वापरलेल्या सीरियातील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश दिला तर, अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला होता.