सोशल दुनियेतील टिवटिव झाली दहा वर्षांची!
By admin | Published: March 22, 2016 04:18 AM2016-03-22T04:18:31+5:302016-03-22T04:18:31+5:30
अवघ्या १४० अक्षरांमध्ये युझर्सना आपल्या भावना पोहोचवायला लावणाऱ्या, प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ‘ट्विटर’ला सोमवारी १० वर्षे पूर्ण झाली.
वॉशिंग्टन : अवघ्या १४० अक्षरांमध्ये युझर्सना आपल्या भावना पोहोचवायला लावणाऱ्या, प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ‘ट्विटर’ला सोमवारी १० वर्षे पूर्ण झाली. २१ मार्च २००६ साली ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने पहिले ट्विट केले होते. ‘ट्विटर’च्या दशकपूर्तीनिमित्त सकाळपासून लाखो युजर्सनी शुभेच्छा दिल्या असून ट्विटरनेही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत. #LoveTwitterl हा हॅशटॅगही आज ट्रेंडिगमध्ये अव्वल स्थानावर आहे.
> बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या आॅस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली. ‘जस्ट सेंटिग अप माय ट्विटर’ असे पहिले ट्विट जॅक डॉर्सीने २१ मार्च २००६ ला केले आणि ट्विटरचा उदय झाला.
> ट्विटरचे प्रतिस्पर्धी : गेल्या दशकभरापासून प्रसिद्ध असलेल्या ट्विटरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असली तरी आजच्या स्पर्धेच्या युगात ट्विटरलाही प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागत आहे. ट्विटरप्रमाणेच आजच्या पिढीत लोकप्रिय असलेली आणखी एक सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे फेसबुक आणि हीच साईट ट्विटरची प्रतिस्पर्धी आहे. प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईटस्च्या यादीत फेसबुक १०० कोटींहून अधिक युजर्ससह अव्वल क्रमांकावर असून फेसबुकनेच विकत घेतलेले इन्स्टाग्राम ४० कोटी युजर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ट्विटरचा तिसरा क्रमांक लागतो.
> कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटचे यश मोजण्याचा मापदंड म्हणजे, त्यांचे मंथली अॅक्टिव्ह युजर्स. ट्विटरच्या माहितीनुसार, गेल्या ६ महिन्यांत ३० कोटींहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स असून अमेरिकेबाहेर ट्विटरचे २५ कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत.