सोफीया हयातचा सौंदर्यस्पर्धांना विरोध,म्हणे सौंदर्याच्या या व्याख्या चुकीच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 05:43 PM2017-11-28T17:43:28+5:302017-11-28T18:13:28+5:30
लोकांनी घालून दिलेल्या सौदर्याच्या व्याख्येत आपण का स्वत:ला तोलून घ्यायचं असं तिचं म्हणणं आहे.
मुंबई : मानुषी छिल्लरमुळे भारतात १७ वर्षांनी मिस वर्ल्डचा किताब आला आहे. यामुळे देशभर आनंद साजरा केला जातोय. मानुषी छिल्लरवरही कौतुकाचा वर्षाव होतोय. तिने दिलेल्या सडेतोड उत्तराचेही जगभर कौतुक झालं. असा सगळीकडे आनंदी आनंद असताना एका मॉडेलने मात्र मिस वर्ल्डच्या स्पर्धेवरच आक्षेप घेतला आहे. ब्रिटीश वंशांची असलेली भारतीय मॉडेल सोफिया हयात म्हणतेय की, ‘अजूनही अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात याचंच आश्चर्य वाटतंय. मला वाटलं डायनोसर जगातून हद्दपार झाले तेव्हाच या स्पर्धा संपल्या असतील. मात्र तसं अजिबात नाहीए. स्त्रियांच्या सौंदर्याची परिक्षा घेण्याऱ्या स्पर्धा आजही आयोजित केल्या जाताएत.’
आणखी वाचा - मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे नोटाबंदीचे यश, उद्धव ठाकरेंचा टोला
सोफिया हयात हिने इन्स्टाग्रामवर विविध महिलांचे फोटो शेअर करून मिस वर्ल्ड ही स्पर्धा या महिलांना का प्रोत्साहित करत नाही असा सवाल उपस्थित केला आहे. सौंदर्याची अशी कोणतीच विशिष्ट व्याख्या नाहीए. सुंदरतेला कोणताच विशिष्ट चेहरा नाहीए. मग या स्पर्धांमधून स्त्रियांची सुंदरता निवडण्याचा अधिकार कोणी दिला? या स्पर्धेत हिजाब घातलेली स्त्री का सहभागी होत नाही? आपल्या होठात प्लेट घेऊन जगणाऱ्या स्त्रियाही या स्पर्धेत दिसत नाहीत. आयुष्यभर काबाडकष्ट करून दमलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असल्या तरी त्या सुंदर नसतात का? मग अशा स्त्रियाही या स्पर्धांमध्ये का दिसत नाहीत? एवढंच नव्हे तर कोणतीही ट्रान्सजेंडर व्यक्तीही या स्पर्धेत नसते, तसंच १६ साईजवाल्या स्त्रियाही इकडे दिसत नाहीत. या प्रत्येक स्त्रिला स्वत:चं सौंदर्य आहे. पण आपल्याकडे सौंदर्याचा एका साचा तयार करण्यात आला आहे, या साच्यात जी महिला बसेल तीच सुंदर आहे, असं सोफियाचं म्हणणं आहे.
आणखी वाचा - मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा
पुढच्या पोस्टमध्ये ती म्हणते की, ‘वर दिलेल्या फोटोंपैकी जास्त सुंदर कोण आहे? तुमची सुंदरेतेची व्याख्या काय आहे यावर सुंदर कोण आहे हे ठरेल. पण खरंतर या चौघीही फार सुंदर आहेत. कोणीही कोणापेक्षा कमी किंवा कोणापेक्षा जास्त सुंदर नाहीए. आपली कोणीतरी कोणाशी तुलना करावी किंवा कोणी आपल्या सौंदर्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. लोकांनी ठरवलेल्या सौंदर्यतेवर न जाता आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. इतरांच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाहीत, याचा अर्थ आपण सुंदर नसतो असं नाही. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी झुगारून स्वत:चं सौंदर्य जपत जगलं पाहिजे. तुम्ही जसे कोणी असाल, स्वत:वर प्रेम करायला हवं. जगातील प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर, लहान, मोठा, गरीब, श्रीमंत सारेच सुंदर आहेत.’