सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार!

By admin | Published: December 15, 2015 02:55 AM2015-12-15T02:55:42+5:302015-12-15T02:55:42+5:30

सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय

Solar power project rejects solar power project! | सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार!

सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार!

Next

रेलिघ (उत्तर कॅरोलिना) : सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय कारणावरून अमेरिकेसारख्या प्रगत देशातील एका शहराने त्यांच्या येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास नकार दिला आहे.
उत्तर कॅरोलिना राज्याच्या वूडलॅण्ड शहरातून २५८क्रमांकाचा महामार्ग जातो. या महामार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव एका खासगी कंपनीने नगरपालिकेकडे दिला होता. येथून जवळच विद्युत उपकेंद्र असल्याने तयार होणारी वीज ग्रीडलाही देणे सोपे होईल म्हणून कंपनीने या ठिकाणाची निवड केली होती.
स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या या प्रस्तावावर वूडलॅण्ड नगरपालिकेच्या सभेत झालेल्या चर्चेत सदस्यांनी भीती व शंका उपस्थित केल्याने सौर ऊर्जा प्रकल्प न उभारू देण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.
नगरपालिकेच्या बैठकीत बॉबी मॅन नामक सदस्याने सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व सूर्यप्रकाशच संपला की शहरात कोणी उद्योगधंदे करायला येणार नाही, असा आक्षेप घेतला. यावर कडी म्हणजे विज्ञान शिक्षिका असलेल्या जेन मॅन या सदस्या म्हणाल्या की, सूर्यप्रकाश मिळाला नाही की परिसरातील वनस्पती कर्बग्रहण क्रियेने स्वत:चे अन्न तयार करू शकणार नाहीत व अखेरीस मरून जातील. जेथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत त्याच्या आसपासच्या झाडांची पाने सुकून गेल्याची आपण पाहिली आहेत, असा स्वानुभवही त्यांनी कथन केला.
सौर ऊर्जा पॅनेलमुळे कोणताही दुष्परिणाम झाल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगरपालिका सदस्यांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. (वृत्तसंस्था)

भारतातही तेच घडले होते
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांचा जास्तीत वापर करण्यावर पॅरिसमध्ये जगभरातील देशांचे एकीकडे एकमत होत असता अमेरिकेसारख्या देशात स्थानिक प्रशासनाने असा बुरसटलेला विचार करावा, ही चिंतेची बाब आहे.

अर्थात भारतातही पवनचक्क्यांच्या बाबतीत सुरुवातीस हेच झाले होते. पवनचक्क्यांमुळे वाऱ्याची दिशा बदलते व पावसाचे ढग दूर पळतात, असे म्हणून सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकेकाळी ‘विंड फार्म’ उभारण्यास विरोध केला होता.

Web Title: Solar power project rejects solar power project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.