भीषण! कोरोनानंतर आता पुरामुळे दक्षिण आफ्रिका उद्ध्वस्त; 400 लोकांचा मृत्यू, 40 हजार लोक बेघर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:57 IST2022-04-17T15:54:43+5:302022-04-17T15:57:06+5:30
South Africa Flood : डरबन शहराच्या काही भागात पाणी शिरलं, त्यामुळे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली असून लोक या पाण्यात वाहून गेले आहेत.

फोटो - asianet news
कोरोनानंतर आता पुरामुळे दक्षिण आफ्रिका उद्ध्वस्त झालं आहे. पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. देशातील सर्वात भीषण आपत्तीमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत. दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील डरबन शहराच्या काही भागात पाणी शिरलं, त्यामुळे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली असून लोक या पाण्यात वाहून गेले आहेत.
सरकारने शनिवारी माहिती देताना सांगितले की, या आपत्तीतील मृतांची संख्या 398 वर गेली आहे, तर 27 लोक बेपत्ता आहेत. 40 हजारांहून अधिक लोक बेघर झाल्याचंही सरकारने सांगितलं. सरकारच्या म्हणण्यानुसार, घरांमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांपासून लष्कर आणि स्वयंसेवकांपर्यंत शोध आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, डरबन जिल्ह्यातील बेपत्ता कुटुंबातील 10 लोकांपैकी एकाचाही अद्याप शोध लागलेला नाही. डरबन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहिल्या पुरानंतर 6 दिवसांनी, वाचलेल्यांचा शोध घेण्याची आशा आता फारच कमी आहे. त्यांनी सांगितले की, लोक त्यांच्या बेपत्ता नातेवाईकांना शोधण्यासाठी भटकत आहेत.
परिस्थिती पाहता, सरकारने आपत्कालीन मदत निधीमध्ये एक अब्ज रँड ($68 मिलियन) जाहीर केले आहेत. याव्यतिरिक्त, आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे प्रमुख पॅट्रिस मोत्सेपे यांनी 30 दशलक्ष रँड ($2.0) जाहीर केले आहेत. मोटसेपे यांनी लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर येण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.