'नरसंहार'च्या आरोपावरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 16:37 IST2024-01-02T16:34:02+5:302024-01-02T16:37:18+5:30
पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गहन चर्चा करून घेतला निर्णय

'नरसंहार'च्या आरोपावरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर
South Africa vs Israel : गाझामधील नरसंहाराचा आरोप करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी इस्रायलने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर (ICJ) हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली न्यूज वेबसाइट यनेटने सोमवारी रात्री दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गहन चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हानेग्बी यांनी YNET ला सांगितले की, इस्रायलने अनेक दशकांपासून नरसंहाराविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आम्ही कारवाईवर बहिष्कार घालणार नाही, पण हजर होऊन आमच्या विरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडू.
दक्षिण आफ्रिकेने गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींशी संबंधित वंशसंहाराच्या गुन्हे थांबवण्यासाठी आणि कराराअंतर्गत असलेल्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केल्यासंदर्भात इस्रायलविरोधात याचिका दाखल केली आहे. ICJ ने देखील 29 डिसेंबर 2023 रोजी या प्रकरणाची पुष्टी केली आहे. ICJ कडे दिलेल्या ८४ पानांच्या अर्जानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी एका निवेदनात म्हटले आहे की इस्रायल नरसंहार थांबविण्यास बांधील आहे. गाझा पट्टीमध्ये बळाचा अंदाधुंद वापर केल्यामुळे सध्याच्या इस्रायली हल्ल्यात अडकलेल्या नागरिकांच्या दुर्दशेबद्दल दक्षिण आफ्रिका चिंतेत आहे. मानवतेविरुद्धचे हे गुन्हे आणि युद्ध वाईटाकडे जात आहे. हे थांबले नाही तर आणखी नरसंहार किंवा संबंधित गुन्ह्यांचा संदर्भ वाढत जाईल, असे आफ्रिकेकडून मांडण्यात आले आहे.
इस्रायलचे म्हणणे काय?
प्रत्युत्तरादाखल, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हयात म्हणाले की, दक्षिण आफ्रिका एका दहशतवादी संघटनेला सहकार्य करत आहे, जी इस्रायली राज्याचा नाश करण्यासाठी हल्ले करत आहे. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना मानवी ढाल म्हणून वापरणे आणि त्यांच्याकडून मानवतावादी मदत चोरणे यासाठी हमास जबाबदार आहे. इस्रायल नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कार्य करते आणि केवळ हमास दहशतवादी संघटना आणि हमासला सहकार्य करणार्या इतर दहशतवादी संघटनांविरुद्धचे लष्करी प्रयत्न निर्देशित करते.