किम जोंग उन यांची मृत्यूशी झुंज?; दक्षिण कोरियाने प्रकृतीबाबत केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:40 PM2020-04-21T13:40:38+5:302020-04-21T13:44:36+5:30
किम जोंग उन यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती.
उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या हृदयावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यानंतर किम जोंग यांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने दिले होते. अमेरिकेच्या किम जोंग यांच्या प्रकृतीबाबतच्या वृत्तामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र आता किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत दक्षिण कोरिया मोठा खुलासा केला आहे.
दक्षिण कोरियामधील किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या त्यांना माउंट कुमगांग येथील रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने दिलेले किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत दिलेलं वृत्त खोटं असल्याचा दावा दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी केला आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, किम जोंग उन यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती. लठ्ठपणाचा त्यांना त्रास होता. त्याशिवाय अति धुम्रपानाच्या आहारी ते गेले होते. किम हे ११ एप्रिल रोजी दिसले होते. इतकंच नव्हे किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या १५ एप्रिलच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती. किम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली होती. मात्र हे सर्व वृत्त खोटी असल्याचा खुलासा दक्षिण कोरियाने केला आहे.
किम जोंग उन यांचे वडिल किम जोंग इल यांच्याबाबतही अशाच प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. उत्तर कोरियाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ते गैरहजर होते. त्यावेळी ही उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले होते. अखेर किम जोंग इल यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर किम जोंग उन यांच्या हाती उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे आली.