दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत भेटीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:05 AM2018-07-02T11:05:47+5:302018-07-02T11:06:24+5:30
भारतामध्ये मून जाए- इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. मून जाए इन यांची ही पहिलीच भारतभेट आहे.
सेऊल- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन 8 ते 11 जून असे चार दिवस भारताच्या भेटीवर येत आहेत.भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील आर्थिक सहकार्यासंदर्भात विविध विषयांवर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार ते भारतामध्ये येत आहेत.
भारतामध्ये मून जाए- इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. मून जाए इन यांची ही पहिलीच भारतभेट आहे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कामकाज पाहाणाऱ्या ब्लू हाऊसने दिलेल्या माहितीमध्ये, भारत हा केवळ दक्षिण कोरियाचा आर्थिक बाबतीत भागीदार नसून तो कोरियन व्दीपकल्पावर शांतता आणि समृद्धी येण्याच्या कार्यातही महत्त्वाचा सहकारी आहे असे नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण कोरिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 1973 साली अधिकृत संबंधांची स्थापना झाली. भारत भेटीनंतर मून जाए इन 11 ते 13 जूलै सिंगापूरमध्ये असतील. गेल्याच महिन्यामध्ये सिंगापूरमध्ये उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. कोरियन द्वीपकल्पावरील अणूकार्यक्रमाचे उच्चाटन करण्यासाठी त्या दोघांमध्ये एकमत झाले. तत्पुर्वी किम जोंग उन आणि मून जाए इन यांची दक्षिण कोरियाच्या हद्दीमध्ये ऐतिहासिक भेट होऊन चर्चा झाली होती.