दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन जुलैमध्ये भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 05:27 PM2018-06-07T17:27:33+5:302018-06-07T17:27:33+5:30
गेल्याच महिन्यात भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्हीके सिंह उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते.
नवी दिल्ली- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन पुढील महिन्यात भारतात येणार आहेत. त्यांच्या भारतभेटीची तारिख निश्चित झाली नसली तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते भारताच्या दौऱ्यावर येतील असे सांगण्यात येत आहे. गेल्याच महिन्यात भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्हीके सिंह उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. सुमारे 20 वर्षांनंतर त्यांच्या रुपाने भारतातील एका उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली. त्याचबरोबर भारताने उत्तर कोरियामध्ये राजदुताची नेमणूकही केली. भारत आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये नव्याने संबंध प्रस्थापित होत असण्याच्या पार्श्वभूमीवर आता दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत असल्याने त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मे महिन्यात जनरल व्ही के सिंह यांनी उत्तर कोरियाच्या सर्वोच्च संसदेचे उपाध्यक्ष किम योंग डाए, परराष्ट्र मंत्री री योंग हो, परराष्ट्र उपमंत्री चोए हुइ चोल, सांस्कृतीक मंत्री पाक चुन नाम यांची भेट घेतली होती आणि राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक सहकार्यावर चर्चा केली होती. त्यापुर्वी काहीच दिवस उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन यांची ऐतिहासिक भेट झाली होती. शीतयुद्धाच्या प्रदीर्घ काळानंतर या दोन्ही देशांमध्ये संवादाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर आता 12 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये भेट होणार आहे.