पत्नीच्या ‘बॅग’ने केली राष्ट्राध्यक्षांची अडचण; निवडणुकीपूर्वी Video झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 07:57 AM2024-02-12T07:57:45+5:302024-02-12T07:58:30+5:30

आपल्या रिस्ट वॉचमधल्या कॅमेऱ्यातून त्यानं हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओत किम त्या व्यक्तीला विचारताना दिसतात, तुम्ही माझ्यासाठी अशा साऱ्या वस्तू कशासाठी आणतात?

South Korean President Yoon Suk Yeol's wife's expensive bag has caused a problem | पत्नीच्या ‘बॅग’ने केली राष्ट्राध्यक्षांची अडचण; निवडणुकीपूर्वी Video झाला व्हायरल

पत्नीच्या ‘बॅग’ने केली राष्ट्राध्यक्षांची अडचण; निवडणुकीपूर्वी Video झाला व्हायरल

कोणत्याही देशाचं राष्ट्राध्यक्षपद किंवा पंतप्रधानपद मिळणं, मिळवणं, ही तशी मोठी मानाची गोष्ट. एखाद्या देशाच्या प्रमुखपदी पोहोचणं, ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सर्वार्थानं आपली लायकी, कुवत सिद्ध करावी लागतेच, पण त्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागते. मुख्यत: आपलं आचरण आणि चारित्र्य शुद्ध असणं, ही त्यासाठी महत्त्वाची अट मानली जाते. त्याशिवाय तुम्हाला या सर्वोच्च पदावर पोहोचणं कठीण असतं. समजा, ते तिथे पोहोचले आणि नंतर अशी काही एखादी गोष्ट उघड झाली तरीही ती त्यांच्यासाठी त्रासदायकही ठरू शकते.

नैतिकतेच्या कारणावरून आजवर अनेक देशांच्या अनेक प्रमुखांना एकतर राजीनामा द्यावा लागला आहे, पायउतार व्हावं लागलं आहे किंवा मी त्यात ‘दोषी’ नाही हे सिद्ध करावं लागलं आहे. काही वेळा काही राष्ट्रप्रमुखांना त्यांची पत्नी म्हणजेच ‘फर्स्ट लेडी’मुळेही टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्यात अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी. अर्थात खुद्द इमरान खान यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आणि इतर आरोप आहेतच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यामुळे काही वेळा टीकेला सामोरं जावं लागलं आहे. 

या यादीत ताजं नाव आहे ते म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांच्या पत्नी ‘फर्स्ट लेडी’ किम कियोन यांचं. दक्षिण कोरियात दहा एप्रिलला निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर किम यांच्या कृतीमुळे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. हे प्रकरण युन यांना महाग पडणार असंही म्हटलं जात आहे. पण, असं घडलं तरी काय, ज्यामुळे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष अडचणीत आले आहेत?... 

मुळात हे प्रकरण तसं जुनं आहे. ‘फर्स्ट लेडी’ किम कियोन यांनी एका जगप्रसिद्ध कंपनीची महागडी बॅग ‘गिफ्ट’ म्हणून स्वीकारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्या स्वत: अडचणीत आल्या आहेतच, पण त्याचा फटका त्यांच्यापेक्षाही त्यांचे पती विद्यमान राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना बसण्याची शक्यता आहे. खरं तर हा व्हिडीओ आहे सप्टेंबर २०२२चा. २०२३च्या अखेरीस तो उघडकीस आला आणि प्रचंड व्हायरला झाला. भारतीय रुपयांत या बॅगची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीनं हा व्हिडीओ शूट केला, त्यानंच ही बॅग त्यांना गिफ्ट दिली होती. आपल्या रिस्ट वॉचमधल्या कॅमेऱ्यातून त्यानं हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओत किम त्या व्यक्तीला विचारताना दिसतात, तुम्ही माझ्यासाठी अशा साऱ्या वस्तू कशासाठी आणतात?

हा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी तो लगेचच आपल्या व्हिडीओ चॅनेलवर अपलोडही केला आणि राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय लाच प्रकरणात सामील असल्याचा आरोप सुरू केला आहे. दक्षिण कोरियाचे नियतकालिक कोरिया हेराॅल्ड यांच्या मते या गिफ्टला लाच म्हणता येणार नाही. कारण, त्याची पावती त्यांच्याकडे आहे आणि भेट मिळालेली ही बॅग दक्षिण कोरिया सरकारची प्रॉपर्टी आहे. राष्ट्राध्यक्ष यून यांच्या पक्षानंही हे आरोप उडवून लावले असले तरीही जनतेनं मात्र याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर असेल्या व्यक्तीचं चारित्र्य शुद्धच असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दक्षिण कोरियात यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका सर्वेक्षणात ६९ टक्के मतदारांनी म्हटलं आहे, या ‘भ्रष्टाचाराची’ जबाबदारी राष्ट्राध्यक्षांनी घेतली पाहिजे. ५३ टक्के मतदारांनी तर अगदी स्पष्टपणे सांगितलं, फर्स्ट लेडी किम यांनी जे केलं, ते अत्यंत चुकीचं आहे. 

किम ५१ वर्षांच्या असल्या तरी त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या स्टाइलमुळे दक्षिण कोरियात त्या ‘फॅशन आयकॉन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्या देशाच्या राजकारणात खूप दखल घेतात, ढवळाढवळ करतात, असाही आरोप आधीपासूनच केला जात आहे. किम राजकारणात नुसती ढवळाढवळच करीत नाहीत, तर पडद्यामागून संपूर्ण सरकारच त्या ‘कंट्रोल’ करतात, असाही अनेकांचा दावा आहे. 

बंडखोर ‘फर्स्ट लेडी’ किम कियोन! 
दक्षिण कोरियन ‘संस्कृती’चा विचार करता तिथे ‘फर्स्ट लेडी’नं ‘पॉलिटिकली ॲक्टिव्ह’ असणं प्रशस्त मानलं जात नाही. त्यामुळे दक्षिण कोरियातील आजवरच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी, ‘फर्स्ट लेडी’ उघडपणे सामाजिक स्तरावर आलेल्या नाहीत. किम यांनी मात्र हे सगळे संकेत धुडकावून लावले होते. त्या फॅशन आयकॉन आहेत, पॉलिटिकली ॲक्टिव्ह आहेत, अनेक गोष्टींवर त्या जाहीरपणे आपलं मत मांडतात. बॅग प्रकरणापासून मात्र त्या माघारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक व्यासपीठांवरही त्या दिसलेल्या नाहीत.

Web Title: South Korean President Yoon Suk Yeol's wife's expensive bag has caused a problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.