सूर्याहून १०० पटीनं मोठा तारा, पहिल्यांदाच टिपला गेला ताऱ्यावरील स्फोटाचा अद्भूत फोटो; शास्त्रज्ञही हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:23 PM2021-08-06T21:23:16+5:302021-08-06T21:24:27+5:30
ऑस्ट्रेलियातील एका अॅस्ट्रॉनॉमर्सनं पहिल्यांदाच एक असा फोटो टिपला आहे की जो पाहून अंतराळ वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत.
अंतराळाच्या रोमांचक दुनियेत रोज काही ना काही घडत असतं. ऑस्ट्रेलियातील एका अॅस्ट्रॉनॉमर्सनं पहिल्यांदाच एक असा फोटो टिपला आहे की जो पाहून अंतराळ वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत. याआधी एखाद्या प्रचंड मोठ्या आकाराच्या ताऱ्यामध्ये झालेल्या स्फोटाचं छायाचित्र कॅमेरामध्ये कैद केलं गेलं नव्हतं. तेही एक असा तारा की जो सूर्यापेक्षाही १०० पटीनं आकारानं मोठा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या अंतराळतज्ज्ञानं एक ऐतिहासिक क्षण कॅमेरामध्ये टिपला आहे. एक सुपरनोव्हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला असून यात एका मोठा स्फोट झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. प्रचंड तापमान असलेल्या या ताऱ्यावर होणाऱ्या स्फोटापूर्वी निर्माण झालेले तरंग देखील कॅमेरात कैद झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठाचे अंतराळ तज्ज्ञ पॅट्रीक आर्मस्ट्राँग यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेला शॉक कूलिंग कर्व्ह असं संबोधलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ताऱ्यावर झालेला प्रचंड ताकदीचा स्फोट.
एखाद्या विस्मयकारक स्फोटाचा अशापद्धतीनं विस्तृत फोटो टिपला जाण्याची ही पहिलीच घटना ठरावी, असं पॅट्रीक यांनी म्हटलं आहे. पण स्फोटापूर्वी निर्माण झालेल्या तरंगांचं रंग अचानक कसा काय बदलला हे जाणून घेण्यासाठी आमची उत्सुकता आहे, असंही ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठानं ताऱ्यावरील स्फोटाचा हा फोटो नाराच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपचा वापर करुन टिपला आहे.