भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:11 AM2019-04-03T08:11:28+5:302019-04-03T08:11:54+5:30
भविष्यातील मोहिमांसाठी नाही अनुकूल : ‘नासा’चे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन
वॉशिंग्टन : भारताने त्याच्या उपग्रहांपैकी एक पाडून टाकल्यामुळे त्याचे ४०० तुकडे निर्माण झाले व आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोक्यात आणले, ही एक भयंकर बाब आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळवारी म्हटले.
गेल्या आठवड्यात भारतानेमिशन शक्तीद्वारे लो अर्थ आॅर्बिट उपग्रह यशस्वीपणे लक्ष्य करून पाडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचे हे अभूतपूर्व यश असल्याचे व त्यामुळे भारत अंतराळात शक्तिमान देश बनल्याचे म्हटले होते.
भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले असल्याचे ब्रिडेन्स्टीन म्हणाले. सगळ्याच तुकड्यांचा शोध घेता येईल एवढे काही ते सर्व मोठे नाहीत. नासा सध्या १० सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांचा शोध घेत आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ६० तुकडे शोधण्यात आले असून, त्यापैकी २४ तुकड्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका निर्माण केलेला आहे. भारताने केलेल्या या एसॅट चाचणीविरुद्ध जाहीरपणे बोलणारे ब्रिडेन्स्टीन हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत.
भयंकर घटना
नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन म्हणाले की, पाडण्यात आलेल्या उपग्रहाचे सुमारे ६० तुकडे आतापर्यंत सापडले असून, त्यापैकी २४ तुकडे आयएसएसच्या कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या बिंदूच्या बाहेर सापडले आहेत. उपग्रहाचा मलबा (डेब्रिस) निर्माण करणे आणि आयएसएसच्या सर्वोच्च बिंदूच्याही वर तो जाणे ही भयंकर घटना आहे. अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असेही ते म्हणाले.