सर्दी-पडशानंही मरायचे बलाढ्य डायनासोर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 08:21 AM2022-02-21T08:21:12+5:302022-02-21T08:21:42+5:30

१५ कोटी वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या डायनासोरसारख्या बलाढ्य, महाकाय प्राण्यांनाही सर्दी-पडसं व्हायचं आणि त्यामुळे त्यांना मृत्यूही यायचा, असं जर कोणी म्हटलं तर..?

spacial article on Mighty dinosaurs to die of cold know more details what expert says | सर्दी-पडशानंही मरायचे बलाढ्य डायनासोर ?

सर्दी-पडशानंही मरायचे बलाढ्य डायनासोर ?

Next

आपल्या सर्वांनाच कधी ना कधी सर्दी-पडसं, ताप, काही किरकोळ आजार होतात. काहींना कॅन्सरसारखे जटिल आजार होतात. गुडघेदुखी ही तर आता जणू काही सर्वांच्या जन्मालाच पूजली आहे, इतकी सर्वसामान्य झाली आहे. ग्रामीण, आदिवासी भागात आजही सर्दी-पडसं, न्युमोनियानं अनेक लहान मुलं दगावतात, ही वस्तुस्थिती आहे, पण १५ कोटी वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या डायनासोरसारख्या बलाढ्य, महाकाय प्राण्यांनाही सर्दी-पडसं व्हायचं आणि त्यामुळे त्यांना मृत्यूही यायचा, असं जर कोणी म्हटलं तर..?

- खुद्द शास्त्रज्ञांनीच या गोष्टीला दुजोरा दिला आहे. कारण त्यांच्याहाती तसे ठोस पुरावेच लागले आहेत. १५ कोटी वर्षांपूर्वीच्या एका डायनासोरचे अवशेष शास्त्रज्ञांनी नुकतेच तपासले आणि निष्कर्ष काढला की, हो, डायनासोरनाही सर्दी-पडसं व्हायचं आणि त्याचं प्रमाण वाढलं की, त्यांना भयानक त्रास व्हायचा. इतका की, त्याचा संसर्ग अगदी फुफ्फुसापर्यंत जायचा आणि ही साधी वाटणारी सर्दी त्यांच्यासाठी जीवघेणी ठरायची. १५ कोटी वर्षांपूर्वीच्या ज्या डायनासोरचे अवशेष शास्त्रज्ञांना सापडले आहेत, त्या डायनासोरला संशोधकांनी नाव दिलं आहे ‘डॉली’. या डॉलीलाही सर्दी-पडसं झालं होतं आणि त्याचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत गेल्यानं डॉलीचा मृत्यू झाला होता, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

या डायनासोरचे जे जिवाश्म शास्त्रज्ञांना मिळाले आहेत, त्यामुळे पुरातन काळातील जीवसृष्टीवर आणखी बराच प्रकाश पडेल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. डॉलीचे अवशेष जुरासिक काळातील आहेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हा डायनासोर मृत्युमुखी पडला, त्यावेळी आजारी होता, याचेही पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत. मुख्य म्हणजे हा डायनासोर पूर्णपणे शाकाहारी होता आणि ‘सॉरोपॉड्स’ प्रजातीचा  होता. तरुण वयात म्हणजे केवळ १५ वर्षांचा असताना या डायनासोरचा मृत्यू झाला होता. त्याची लांबी सुमारे १८ मीटर होती. त्याची मानही चांगलीच लांब होती. अमेरिकेतील मेटाना येथे १९९० मध्ये पहिल्यांदा या डायनासोरचे जिवाश्म संशोधकांना आढळून आले होते.

शास्त्रज्ञांनी डॉलीचं सिटी स्कॅन आणि इतर तपासण्या केल्या, तेव्हा त्यांना आढळून आलं की, डॉलीला फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता आणि हा संसर्ग पार हाडांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे हा डायनासोर अतिशय विकलांग बनला होता. अमेरिकेतील मेटाना येथे असलेल्या ग्रेट प्लेन्स् डायनासोर म्युझियमचे संचालक डॉ. कॅरी वुडरफ यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या टीमनं डॉलीची संपूर्ण तपासणी; विशेषत: हाडांची तपासणी केली, तेव्हा त्यांना आढळून आलं की, डॉलीच्या मानेच्या तीन हाडांचा आकार थोडा वेगळा आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ही तिन्ही हाडं या डायनासोरच्या श्वसनयंत्रणेशी जुळलेली होती.

डॉली या डायनासोरला आधी न्यूमोनिया आणि फ्ल्यूची लक्षणं जाणवायला लागली असावीत. शिंका, खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानं त्याची हालचाल मंदावली असावी, त्यात डायरिया झाल्यानं त्याच्यातला अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर वाढला असावा. डॉलीच्या मानेच्या तीन हाडांवर ब्रोकोलीसारखी बुरशीची असामान्य वाढ दिसून आली, हे सर्व घटक श्वसनयंत्रणेशी जोडलेले असल्यानं फुफ्फुसांना जोडलेल्या हवेच्या पिशव्यांमध्येही संसर्ग झाला. डॉलीला एस्परगिलोसिससारख्या बुरशीजन्य संसर्गानेही ग्रासलं होतं. हा एक सामान्य श्वसनाचा आजार आहे, ज्यामुळे कधीकधी हाडांना संसर्ग होतो. हा संसर्ग अनेकदा पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी जीवघेणा ठरतो. आधी सर्दी, मग ताप, त्यानंतर फुफ्फुसांचा संसर्ग यामुळे डॉलीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

डॉलीचा मृत्यू झाला, त्यावेळी या डायनासोरची लांबी साठ फूट (सुमारे १८ मीटर) आणि वजन सुमारे चार ते पाच टन होतं. डॉलीच्या वयाचा अगदी निश्चित आकडा सांगता येत नसला, तरी  तारुण्यावस्थेतल्या डॉलीचं वय १५ ते २० वर्षे यादरम्यान असावं, हे मात्र शास्त्रज्ञ खात्रीनं सांगतात. विटमर हे संशोधक म्हणतात, ‘डॉली’चा मृत्यू झाला, त्यावेळी या डायनासोरला किती हालअपेष्टांमधून जावं लागलं असेल, याचा विचार करून आमच्याही डोळ्यांत पाणी येतं.

‘डॉली’- नर की मादी ?
१५ कोटी वर्षांपूर्वीच्या या डायनासोरचं नाव शास्त्रज्ञांनी ‘डॉली’ असं ठेवलं असलं, तरी या डायनासोरचं लिंग मात्र त्यांना अजून ठरवता आलेलं नाही. ‘डॉली पार्टन’ या प्रसिद्ध, आंतरराष्ट्रीय गायिकेच्या नावावरून या डायनासोरला ‘डॉली’ असं नाव देण्यात आलं आहे. डॉली आजारी असल्यामुळेच ती आपल्या कळपासोबत राहू शकत नव्हती का? त्यामुळे ती एकटी पडली होती का? तिला नैराश्य आलं होतं का? माणसांना जसे आजार होतात, तसेच आजार तिलाही झाले होते का्? या साऱ्या प्रश्नांचं उत्तर शास्त्रज्ञांनी ‘हो’ या एकाच शब्दात दिलं आहे. तरी आणखीही एक शक्यता उरतेच. डॉली कमजोर झाल्यामुळे तिच्यापेक्षा मोठ्या, बलवान डायनासोरनं डॉलीची शिकार केली असावी का? तीही शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: spacial article on Mighty dinosaurs to die of cold know more details what expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.