नो वन फाइट्स अलोन-मुलांची अजब दोस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:12 AM2022-07-15T08:12:57+5:302022-07-15T08:13:22+5:30

आपल्या आयुष्यात दोस्तांचं, मित्रांचं स्थान किती? - कोणीही सांगेल, यार, माझे मित्र आहेत, म्हणूनच आज मी आहे. माझ्या आयुष्यात माझे मित्र नसते, तर माझं काय झालं असतं, ते खरंच मला सांगता येणार नाही.

spacial article worldwide No One Fights Alone Childrens Strange Friendship cancer treatment | नो वन फाइट्स अलोन-मुलांची अजब दोस्ती!

नो वन फाइट्स अलोन-मुलांची अजब दोस्ती!

Next

आपल्या आयुष्यात दोस्तांचं, मित्रांचं स्थान किती? - कोणीही सांगेल, यार, माझे मित्र आहेत, म्हणूनच आज मी आहे. माझ्या आयुष्यात माझे मित्र नसते, तर माझं काय झालं असतं, ते खरंच मला सांगता येणार नाही. माझ्या सुखात, माझ्या दु:खात, माझ्या अडचणीच्या काळात माझे दोस्तच तर होते; ज्यांनी मी चूक आहे की बरोबर, माझ्या निर्णयाचे परिणाम काय होतील, मला साथ दिल्यामुळे आपल्यालाही कदाचित अडचणीत सापडावं लागेल का... या साऱ्यापैकी अगदी कश्शाचाही विचार न करता माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले, प्रसंगी माझ्या घरच्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली, माझ्याशी संबंध तोडले, पण या दोस्तांनीच तर मला जगवलं.

आपल्या घासातला अर्धा घास प्रसंगी मला देताना माझ्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, ‘लढ मित्रा... जे होईल ते होईल, आपण बघून घेऊ, आम्ही तुझ्यासोबत आहोत...’ ज्यांच्या डोळ्यांत असंख्य स्वप्नं आहेत आणि कसलाही विचार न करता, कुणाशीही भिडण्याची रग ज्यांच्या अंगात आहे, अशा तरुण मित्रांसाठी तर त्यांचे दोस्त हीच त्यांची जिंदगी! त्यामुळेच एकमेकांसाठी अक्षरश: काहीही करण्याची त्यांची तयारी असते. असाच एक प्रसंग नुकताच एका लहान दोस्ताबरोबर घडला. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. हसी-मजाक, मौज-मस्ती... हा तर त्यांचा रोजचा याराना सुरू होताच,  त्याचबरोबर त्यांचं शिक्षणही सुरू होतं... पण अचानक सारं काही बदललं. दोस्तांच्या या ग्रुपमधील एकजण गंभीर आजारी पडला. 

अनेक डॉक्टर, तपासण्या झाल्या. या लहानग्या मित्राला कॅन्सर डिटेक्ट झाला. मनातून तो हादरला, निराश झाला. खरंतर त्याच्या कॅन्सरची ही तशी सुरुवात होती, त्यात फार काही घाबरण्यासारखं नव्हतं, पण त्याच्या केसमध्ये थोडे कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे त्याला जरा चिंता वाटत होती. आजवरच्या आपल्या हसत्या-खेळत्या आयुष्यात एकदम हे कसलं संकट आलं, म्हणून तो खचला, पण त्याचे सारे दोस्त त्याच्या पाठीशी होते. आजारामुळे त्यानं काही दिवस सुट्टी घेतली. कॅन्सरची ट्रिटमेंट सुरू केल्यावर आणि थोडं बरं वाटायला लागल्यावर तो पुन्हा वर्गात, आपल्या मित्रांमध्ये आला. 

आजारानंतर आपल्या सगळ्या दोस्तांची एकदम एकाचवेळी भेट होण्याची ही पहिलीच वेळ... पण या भेटीनं तो नुसता गदगदूनच गेला नाही, त्याच्या डोळ्यांतून केवळ अश्रूंच्या धाराच वाहिल्या नाहीत, तर कॅन्सरविरुद्ध लढण्याची प्रचंड धमकही एकाएकी त्याच्यात निर्माण झाली. आपले दोस्त असताना, कॅन्सरच काय, तर यमराजही ‘आपल्या केसाला’ धक्का लावू शकणार नाही, एवढी हिंमत त्याच्यात आली. कॉलेजच्या त्या पहिल्याच दिवसानं त्याच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणला.

पण त्यादिवशी असं घडलं तरी काय?... - हा दोस्त बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा वर्गात आला, तेव्हा त्याच्या सगळ्या दोस्तांनी त्याला प्रेमानं आलिंगन दिलं, त्याच्या पाठीवर थाप मारुन जसं काही मधल्या काळात काही झालंच नाही, जणू कुठल्याही गॅपशिवाय कालच्याप्रमाणे आजही आपण भेटतोय, अशा तऱ्हेनं त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात प्रत्येकानं वर्गात त्याच्यासमोरच आपल्या डोक्याचे केस भादरुन चमनगोटा करायला सुरुवात केली. 
एक झाला, दुसरा झाला, एक एक करत अख्ख्या वर्गानं आपल्या डोक्यावरचे केस भादरुन टाकले. आश्चर्याची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं करण्यात त्याचे शिक्षकही मागे नव्हते. 

काहीही झालं तरी आम्ही सारेच आमच्या या तरुण दोस्ताच्या पाठीशी आहोत, हे एक शब्दही न बोलता सांगणारी त्यांची कृती या दोस्ताच्या अंत:करणाला स्पर्शून गेली. त्यावेळी आपल्या या दोस्तांच्या प्रति त्याची छाती अभिमानानं कशी फुलून आली, हे सांगायला अर्थातच त्याच्याकडे शब्द नव्हते आणि शब्दांतून काही व्यक्त करण्याची त्यालाही गरज वाटली नाही. त्याचे डोळेच सारे काही सांगत होते.

लहानग्यांच्या दोस्तीला सलाम!
कोण, कुठला हा कॅन्सरग्रस्त मुलगा आणि कोण त्याचे हे दोस्त? - खरं तर कोणीच याबद्दल जाहीर वाच्यता केली नाही. या संदर्भातला एक व्हिडीओ फक्त त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि काही क्षणांतच तो व्हायरल झाला. ब्राझीलमधला हा व्हिडीओ आहे, असं एका यूजरनं म्हटलंय, पण त्याची खातरजमा झालेली नाही. या व्हिडीओसोबत एक पोस्ट केवळ त्यांनी टाकली. त्यावर लिहिलं होतं, ‘नो वन फाइट्स अलोन’... या लढाईत आम्ही कुणीच एकटे नाही... या लहानग्या दोस्तांच्या प्रेमाची ही अनोखी कहाणी पाहून अनेकांच्या डोळ्यांत आपोआपच पाणी आलं आणि त्यांनीही या दोस्तीला सलाम केला!

Web Title: spacial article worldwide No One Fights Alone Childrens Strange Friendship cancer treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.