स्पेनचा लॉकडाउन वेढा सुटतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:49 AM2020-06-01T00:49:45+5:302020-06-01T00:49:50+5:30
कोरोना मृत्यूचे थैमान दोन महिन्यांत नियंत्रणात : जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या आशा झाल्या अधिक पल्लवित
संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ६४७, ७८०, ९०० असा दररोज मृतांचा आकडा नवनवे विक्रम प्रस्थापित करत होता. केवळ स्पेनच नाही तर जगभरातील लोकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. सरकारने उशीर तर केला नाही ना, अशी भावना निर्माण होत होती. परंतु, दोन महिने सर्वच आघाड्यांवर झालेल्या काटेकोर प्रयत्नांनंतर हा आलेख आता शंभरच्या खाली आला आहे. त्यामुळेच लॉकडाउनचा वेढा हळूहळू सैल होतोय. टप्प्याटप्प्याने सवलती वाढवून जून अखेरपर्यंत जनजीवन पूर्वपदावर येईल, असे आशादायी चित्र दिसू लागल्याची माहिती स्पेन येथे वास्तव्याला असलेल्या अशोक झांजुर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कोरोनाचा पहिल्या टप्प्यात सर्वाधिक उद्रेक स्पेनने अनुभवला. आजवर २ लाख ८६ हजार रुग्णसंख्या गाठलेल्या या देशात २७ हजार १२५ लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. सुरुवातीला या धोक्याचा अंदाज न आलेल्या सरकारने १४ मार्चपासून देशभरात कडेकोट लॉकडाउन सुरू केला. प्रत्येक चौकाचौकात आणि अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांबाहेरही पोलीस तैनात केले होते. अत्यावश्यक कारणांशिवाय कुणालाही बाहेर पडण्यास परवानगी नव्हती. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगातही डांबण्यात आले. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाºयांसाठी मेट्रो सुरू होती. बहुसंख्य कर्मचाºयांना वर्क फ्रॉम होमचाच पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाले असले तरी त्यातून नवी भरारी घेण्याची तयारी सुरू आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळलेल्या लोकांना सरकारकडून किमान वेतनाएवढी थेट आर्थिक मदतही दिली जात असल्याचे अशोक यांनी सांगितले.
रुग्णालये सज्ज नव्हती
स्पॅनिश लोक हे सुदृढ असून इथले सरासरी वयोमान ८५ वर्षे आहे. रुग्णालयांमध्ये आयसीयू किंवा व्हेंटिलेटर्सची फारशी गरज लागत नव्हती. गेल्या १०० वर्षांत साथरोगही नव्हते. त्यामुळे रुग्णालये अचानक धडकलेल्या कोरोनाचा सामना करण्यात तोकडी पडली. मात्र, त्यावर अल्पावधीत मात केली.
स्पॅनिश संकटाला भिडणारे
बुल फाईट हे स्पॅनिश कल्चर आहे. जीव धोक्यात टाकून खेळ खेळणारी ही मंडळी संकटाला कायम भिडतात. त्यामुळेच त्यांनी मोठ्या नेटाने कोरोनाचा सामना केल्याचेही अशोक यांचे मत आहे. तसेच, बाहेर फिरणे, खाणेपिणे, तासन् तास गप्पा मारणे इथल्या लोकांच्या रक्तात भिनलेले आहे.
जनता रोज टाळ्या वाजवते
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर थाळीनाद आणि दिवे बंद करून देशाने कोरोना योद्ध्यांना सलाम केला. स्पेनमध्ये दररोज रात्री ८ वाजता देशातला प्रत्येक नागरिक टाळ्या वाजवून या योद्ध्यांना प्रोत्साहन देत असल्याचे अशोक यांनी सांगितले.