‘स्वतंत्र’ कॅटलोनियावर स्पेनचे नियंत्रण, फुटीरवादी सरकार केले बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 02:43 AM2017-10-29T02:43:44+5:302017-10-29T02:43:49+5:30
कॅटलोनिया स्वतंत्र झाल्याची घोषणा तेथील नेत्यांनी करताच, स्पेनने त्या संपूर्ण भागावर सरळ नियंत्रण मिळविले असून, फुटीरवादी सरकारला बरखास्त केले आहे.
बार्सिलोना : कॅटलोनिया स्वतंत्र झाल्याची घोषणा तेथील नेत्यांनी करताच, स्पेनने त्या संपूर्ण भागावर सरळ नियंत्रण मिळविले असून, फुटीरवादी सरकारला बरखास्त केले आहे. कॅटलोनियाच्या फुटीरवादी संसद सदस्यांनी दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्याची घोषणा मंजूर केली होती. त्यानंतर स्पेन सरकारने हे पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान मारियानो राजोय यांनी संसद बरखास्त करताना २१ डिसेंबर रोजी नव्या निवडणुकांचे आवाहन केले आहे. कॅटलोनियाचे राष्ट्रपती कार्ल्स पुइग्डेमोंट यांच्या जागेवर आता पूर्वोत्तर भागात राजोय हे प्रमुख निर्णय घेणारे नेते बनले आहेत. पुइग्डेमोंट आणि कॅटलोनिया कॅबिनेटच्या १२ सदस्यांना आता वेतन देण्यात येणार नाही. त्यांनी निर्देशांचे पालन करण्यास नकार दिल्यास, त्यांच्यावर दुसºयांचे अधिकार बळकाविण्याचा आरोप लावला जाईल.
बरखास्त करण्यात आलेल्या कॅटलोनियाचे पोलीस महासंचालकच आता एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांनी स्पष्ट केले आहे की, ते आदेशांचे पालन करतील. एकूण १३५ सदस्यीय संसदेत दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्याच्या बाजूने ७० मते पडली होती. विरोधी सिनेटरनी मतदानावर बहिष्कार घातला होता. बार्सिलोनाच्या सिनेट इमारतीच्या बाहेर फुटीरवाद्यांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ झेंडे फडकावून आपला आनंद व्यक्त केला होता.
काय आहे कॅटलोनिया?
कॅटलोनिया हा स्पेनचा अतिशय संपन्न भाग आहे. या भागाचा १००० वर्षांचा इतिहास आहे. स्पेनमधील गृहयुद्धापूर्वी या भागाला स्वायत्तत्ता मिळाली होती. हुकूमशहा जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांच्या नेतृत्वात १९३९ ते ७५च्या काळात कॅटलोनियाला स्वायत्तत्ता मिळाली. ती नंतर कमी करण्यात आली. मात्र, फ्रँको यांच्या मृत्यूनंतर कॅटलन राष्ट्रवादाला पुन्हा खतपाणी मिळाले आणि शेवटी उत्तर पूर्व भागात पुन्हा स्वायत्तत्ता द्यावी लागली. सन २००६ च्या कायद्यानुसार कॅटलोनियाला आणखी ताकद देण्यात आली आणि या भागाचा आर्थिक दबदबा वाढू लागला. त्यामुळे त्या भागाला राष्ट्र म्हणून बघितले जाऊ लागले.पण, २०१०मध्ये स्पेनच्या न्यायालयाने कॅटलोनियाचे हे अधिकार परत घेतले. तेव्हापासून येथील स्थानिक प्रशासन नाराज आहे. स्वायत्ततेसाठी येथील नागरिक आक्रमक होऊ
लागले. त्यामुळे २०१५च्या निवडणुकीत फुटीरवाद्यांना विजय मिळाला होता.