ऊर्जा बचतीसाठी पाकचा अजब फंडा
By admin | Published: April 10, 2015 12:45 AM2015-04-10T00:45:58+5:302015-04-10T00:45:58+5:30
उन्हाळ्यातील वेशभूषेसंबंधीचे नियम आणि कार्र्यालयातील वातानुकूलन यंत्रणा बंद करण्याच्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारने ऊर्जा
इस्लामाबाद : उन्हाळ्यातील वेशभूषेसंबंधीचे नियम आणि कार्र्यालयातील वातानुकूलन यंत्रणा बंद करण्याच्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारने ऊर्जा बचतीसाठी एक नवा फंडा अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने राजधानी इस्लामाबाद येथील दुकाने आणि हॉटेल लवकर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, व्यापारी आणि दुकानदार यांनी सरकारच्या या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार, आता राजधानीतील दुकाने रात्री आठ वाजेपूर्वी, तर हॉटेल १० वाजेपर्यंत बंद करावे लागणार आहेत. लग्न समारंभांना काहीशी यातून सूट मिळाली आहे. अशा समारंभांसाठी रात्री ११ वाजेपर्यंत विजेचा वापर केला जाऊ शकेल. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक अजब आदेश सरकारने काढला होता. उन्हाळ्यात सॉक्स वापरू नये, असा फतवा सरकारने काढला होता.
उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानात ऊर्जा बचतीसाठी यापूर्वीही असा फंडा वापरण्यात आला होता. मात्र, यास लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी कारला इंधन पुरवठा करणाऱ्या एलएनजी गॅसचे पंपही काही काळ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. (वृत्तसंस्था)