बेंजामीन नेतान्याहू भारत भेटीदरम्यान मोदींना देणार खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 08:32 PM2018-01-04T20:32:55+5:302018-01-05T11:40:20+5:30
जेरुसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खास गिफ्ट देणार आहेत.
जेरुसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खास गिफ्ट देणार आहेत. बेंजामीन नेत्यानाहू 14 जानेवारीला भारत दौ-यावर येत असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाणी शुद्धीकरण करणारी मशिन भेट स्वरूपात देणार आहेत. पाण्यातील क्षार काढून ते पिण्यास शुद्ध करणारी फिरती मशिन (जीप) भेट देणार आहेत.
गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी इस्रायल दौ-यावर असताना मेडिटेरियन समुद्रात नेतान्याहू व मोदी गेले होते व त्यांनी किना-यावर बग्गी जीपमधून फेरफटकाही मारला होता. आता तीच जीप नेतान्याहू मोदी यांना देणार आहेत. नेत्यानाहू हे चार दिवस भारताच्या दौ-यावर राहणार आहेत. या भेटीदरम्यानच नेत्यानाहू मोदींना बग्गी जीप गिफ्ट म्हणून देणार आहेत.
या बग्गी जीपची किंमत 390,000 शेकेल इतकी आहे. मोदी इस्राएलच्या दौ-यावर होते, त्यावेळी त्यांनी नेत्यानाहू यांचे आभारही व्यक्त केले होते. मी नेत्यानाहू यांचा आभारी आहे. ती जीप मी आज पाहिली. त्या मशिनच्या माध्यमातून समुद्राचं क्षारयुक्त खारं पाणीही शुद्ध करता येऊ शकतं. या मशिनचा उपयोग नैसर्गिक आपत्ती भूकंप, पूर अशा वेळी होऊ शकतो. तसेच लष्करालाही या जीपचा वापर करता येऊ शकतो. ही जीपयुक्त मशिन दिवसाला समुद्राचं 20 हजार लिटर पाणी शुद्ध करू शकते. तर नदीचं 80 हजार लिटर पाणी शुद्ध करण्याची या मशिनमध्ये क्षमता आहे, असंही मोदी म्हणाले होते. अखेर नेत्यानाहू हीच जीप पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात देणार आहेत.
पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याबरोबर मोशेसुद्धा येणार आहेत. मोशेचे आई-वडील मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. खाबाद हाऊस येथे झालेल्या हल्ल्यामधून मोशे बचावला होता. सध्या तो इस्रायलमध्ये त्याच्या आजी-आजोबांसोबत राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जेव्हा इस्रायलला भेट दिली तेव्हा त्यांनी मोशेची भेट घेऊन त्याला भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार आता मोशे भारताच्या भेटीवर येत आहेत. तसेच याच भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, त्याचा स्वीकार नेत्यानाहू यांनी केला होता.
भारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील. यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हाअटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर तेव्हा चर्चा केली होती. इस्रायल आणि भारत यांच्या संबंधांना तेव्हापासून गती मिळाली होती. यावर्षी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनयीक संबंध प्रस्थापित होण्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.