कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी विमान कंपनीची खास ऑफर, एका तिकीटावर एक तिकीट मोफत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:29 PM2021-08-31T14:29:31+5:302021-08-31T14:32:11+5:30
भारतीय नागरिकांसाठी 'बाय वन गेट वन फ्री' म्हणजेच एका प्रवासी तिकीटावर एक तिकीट मोफत अशी जबरदस्त योजना एअरलाइन्स कंपनीनं आणली आहे.
देशात कोरोना विरोधी लसीकरणाची मोहीम वेगानं सुरू आहे. देशात आतापर्यंत ६४ कोटी ४८ लाख डोस देण्यात आले आहेत. यात ४९ कोटी ७० लाखांहून अधिक जणांना कोरोना विरोधी लसीचा एक डोस देण्यात आलेला आहे. तर १४ कोटी ७७ लाख लोकांचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत. भारतातील लसीकरणाचा वेग पाहता शेजारी देश श्रीलंकेनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांच्या प्रवासासाठी परवानगी दिली आहे. यासोबत श्रीलंकन एअरलाइन्स कंपनीनं भारतीय प्रवाशांसाठी एक खास ऑफर देखील आणली आहे.
श्रीलंकेच्या एअरलाइन्स कंपनीने भारतीय नागरिकांसाठी 'बाय वन गेट वन फ्री' म्हणजेच एका प्रवासी तिकीटावर एक तिकीट मोफत अशी जबरदस्त योजना आणली आहे. याअतंर्गत कोलंबोहून भारतात परतताना एका तिकीटासोबत एक तिकीट मोफत दिलं जाणार आहे. ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता श्रीलंकेत उतरल्यानंतर क्वारंटाइन होण्याची गरज नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पण यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे. यासोबत श्रीलंकेत उतरल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला आरटीपीसीआर चाचणीला देखील सामोरं जावं लागणार आहे. यात चाचणी निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधिताला रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या प्रवाशांना संपूर्ण देशात कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे.