चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:03 PM2023-11-08T12:03:28+5:302023-11-08T12:04:09+5:30
श्रीलंका सध्या चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे
China vs India, Sri Lanka Naval Field : अलीकडच्या काळात चीनच्या काही हेर जहाजांनी श्रीलंकेला भेट दिली असल्याचे वृत्त आले होते. आता ही जहाजे श्रीलंकेत पोहोचण्याचा खरा उद्देश समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. चिनी गुप्तचर जहाजांच्या श्रीलंकेला भेट देण्यामागे भारतात दडलेला खजिना कारणीभूत असून यावर चिनी ड्रॅगनची नजर आहे. ही जहाजे कोलंबोला वारंवार भेट देणे हा दक्षिण भारतातील महत्त्वाच्या धोरणात्मक मालमत्तेबद्दल आणि या प्रदेशातील भारताच्या भूमिकेबद्दल माहिती गोळा करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. त्याच वेळी, चीन मुन्नारच्या आखातात असलेल्या पर्यावरणीय आणि खनिज खजिन्याबद्दल अनेक गोष्टींवर नजर ठेवून असल्याचे बोलले जात आहे.
चीनची रणनीती समजणाऱ्या तज्ञांच्या मते, श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात चीनच्या हेर जहाजांद्वारे कारवाया सुरू आहेत. श्रीलंकेने सध्या चीनकडून भरपूर प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामुळे श्रीलंकेला त्या कर्जाच्या ओझ्याखाली राहत, काही गोष्टींना नाईलाजाने परवानगी द्यावी लागत आहे. श्रीलंकेच्या द्विपक्षीय कर्जामध्ये चीनचा वाटा 52 टक्के आहे. श्रीलंकेच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याच्या कोणत्याही प्रयत्नासाठी चीनची मान्यता महत्त्वाची आहे. चीन आपल्या युद्धनौका आणि इतर जहाजांना इंधन भरण्यासाठी हंबनटोटा बंदराचा वापर करत आहेत. अशा स्थितीत केव्हाही ही जहाजे पश्चिम-पूर्व आणि दक्षिण हिंदी महासागराच्या प्रदेशात येतात. भारताच्या सामरिक हितांशी तडजोड होऊ देणार नाही, असा विश्वासही श्रीलंकेने व्यक्त केला आहे. तरीही चीनचा श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रातील हस्तक्षेप या प्रकरणाची भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
मुन्नारच्या आखाताला तीन भिन्न किनारी परिसंस्था, कोरल रीफ, सीग्रास आणि खारफुटी अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. सागरी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हे जगातील सर्वात श्रीमंत क्षेत्रांपैकी एक मानले जाते. हा परिसर त्याच्या अद्वितीय जैविक संपत्तीसाठी देखील प्रसिद्ध आहे. याशिवाय, येथे जागतिक महत्त्व असलेल्या सागरी विविधतेचे भांडार आहे. या खाडीत अनेक हजार वर्षांपूर्वीच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या ४२२३ प्रजाती आहेत. त्यामुळे ते भारतातील सर्वात समृद्ध किनारपट्टी क्षेत्रांपैकी एक बनले जाते. याच नैसर्गित खजिन्यावर चीनची नजर असल्याचे बोलले जात आहे.