Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:25 PM2024-09-24T18:25:04+5:302024-09-24T18:25:54+5:30

Harini Amarasuriya : 'नॅशनल पीपल्स पॉवर'च्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी शपथ दिली.

Sri Lank a: Harini Amarasuriya sworn in as new Prime Minister  | Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला

Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला

Harini Amarasuriya : कोलंबो : श्रीलंकेत अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपती झाल्यानंतर आता नव्या पंतप्रधानांनीही शपथ घेतली आहे. हरिणी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दरम्यान, सिरिमावो भंडारनायके यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून हे पद भूषवणाऱ्या हरिणी अमरसूर्या या देशातील दुसऱ्या महिला नेत्या ठरल्या आहेत. 'नॅशनल पीपल्स पॉवर'च्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी शपथ दिली.

राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी स्वत:सह चार सदस्यांचे मंत्रिमंडळ नियुक्त केले आहे. हरिणी अमरसूर्या यांच्याकडे न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि गुंतवणूक या मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर 'नॅशनल पीपल्स पॉवर'चे खासदार विजिता हेराथ आणि लक्ष्मण निपूर्णाची यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. संसद विसर्जित झाल्यानंतर ते काळजीवाहू कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहतील. तसेच, नोव्हेंबरच्या अखेरीस संसदीय निवडणुका होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, ५६ वर्षीय अनुरा कुमार दिसानायके यांनी रविवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जनता विमुक्ती पेरुमना (जेव्हीपी) या मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांच्या पक्षाचे नेते अनुरा कुमार दिसानायके तथा एकेडी यांचा विजय झाला. नॅशनल पीपल्स पॉवर या आघाडीने श्रीलंका फ्रीडम पार्टी आणि युनायटेड नॅशनल पार्टी या पक्षांचा पराभव केला. यानिमित्ताने श्रीलंकेतील राजकारणाचा दोलक प्रथमच डावीकडे सरकला आहे. म्हणजेच, पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीचा नेता सत्तेवर आला आहे. 

आयएमएफ नवीन सरकारसोबत काम करण्यास उत्सुक 
श्रीलंकेला नवा राष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळाल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आता आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेसोबत सुधारणांबाबत चर्चा करणार आहे. राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या नवीन सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहेत आणि लवकरच देशाच्या कर्ज कार्यक्रमाच्या पुढील पुनरावलोकनाच्या वेळेवर चर्चा केली जाईल, असे आयएमएफने मंगळवारी सांगितले. आयएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही राष्ट्रपती दिसानायके आणि त्यांच्या टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, कारण कठोर परिश्रमातून मिळवलेले यश पुढे नेता येईल, ज्यामुळे श्रीलंकेला २०२० मधील आपल्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.

Web Title: Sri Lank a: Harini Amarasuriya sworn in as new Prime Minister 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.