Sri Lanka Crisis: श्रीलंकेत अराजक: राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर वडिलोपार्जित घर जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:09 AM2022-05-10T06:09:42+5:302022-05-10T06:10:58+5:30
पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा; खासदाराची आत्महत्या, देशभरात संचारबंदी केली लागू
कोलंबो : गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक अरिष्टाचा सामना करीत असलेल्या श्रीलंकेत अराजक निर्माण झाले आहे. सोमवारी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यांत १०० हून अधिक जण जखमी झाले. तर एका खासदाराने आत्महत्या केली. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, संतप्त नागरीकांनी चार खासदारांची घरे पेटवून दिली. याचबरोबर राजपक्षेंचे वडिलोपार्जित घर जाळण्यात आले आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच आर्थिक आणीबाणीच्या संकटात सापडलेल्या श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यांपासून अस्वस्थता आहे. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिंदा यांनी सोमवारी राजीनामा दिला.
ट्विटरवर त्यांनी ही माहिती जनतेला दिली. त्यानंतर राजपक्षे समर्थकांनी विरोधकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. राजधानी कोलंबोत ठिकठिकाणी जाळपोळ सुरू झाली. विरोधकांनी काढलेल्या मोर्चांना लक्ष्य करण्यात आले. या सर्व गदारोळात १७४ जण जखमी झाले. आंदोलकांनी खासदारांची राजधानीतील घरेही जाळली. (वृत्तसंस्था)
आंदोलक आक्रमक
सत्ताधारी श्रीलंका पोदुजना पेरामुना पक्षाचे खासदार अमरकीर्ती अतुकोराला यांच्या गाडीला आंदोलकांनी लक्ष्य केले.
त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता अतुकोराला यांच्या सुरक्षारक्षकाने आंदोलकांवर गोळ्या झाडल्या.
त्यानंतर अतुकोराला यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
अतुकोराला यांनी जवळच्या इमारतीत आश्रय घेतला.
जमावाच्या हाती सापडण्यापूर्वीच अतुकोराला यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
देशभरात संचारबंदी
महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यात हिंसक घटना घडत असून, देशभरात दंगली भडकल्या आहेत.
ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत.
अध्यक्ष गोटाबाया यांनी राजधानीसह देशभरात लष्करी तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असून, सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.