Sri Lanka Crisis: राष्ट्रपतींचे अधिकार काढून घेतले! वेगळा झेंडा, मान झुकविणे सारे बंद; श्रीलंकेत बदलाचे वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 03:29 PM2022-07-16T15:29:36+5:302022-07-16T15:30:04+5:30
श्रीलंकेची जनता गेल्या सात दशकांपेक्षाही भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार हाती घेताच दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
कोलंबो : गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेत बदलाचे वारे सुरु झाले आहेत. राष्ट्रपती पदावर बसलेल्या राजपाक्षे घराण्याने देशाची पुरती वाट लावली आहे. असे असताना आज राजपाक्षेंनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांचे भाषण आज सभागृहात वाचून दाखविण्यात आले. यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे रानिल विक्रमसिंघे हे पुढील राष्ट्रपती नियुक्त होईस्तोवर कार्यवाहक राष्ट्रपती राहणार आहेत.
श्रीलंकेची जनता गेल्या सात दशकांपेक्षाही भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार हाती घेताच दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याचबरोबर देशात लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे.
श्रीलंकेतही राजेशाहीसारखाच थाट राष्ट्रपतींचा होता. विक्रमसिंघे यांनी सर्वात प्रथम राष्ट्रपतींच्या वेगळ्या झेंड्याची तरतूद रद्द केली आहे. देशाला एकच झेंडा असावा तो देखील राष्ट्राचा झेंडा असे मत त्यांनी मांडले. एका खास टेलिव्हिजन संबोधनात विक्रमसिंघे यांनी मी असे कोणताही असंविधानिक रस्ता निवडणार नाही किंवा अशा कोणत्याही कामासाठी मदत करणार नाही असे म्हटले.
याचबरोबर त्यांनी राष्ट्रपतींना म्हटला जाणारा 'महामहिम' हा शब्दही हटविला आहे. यामुळे यापुढे कोणाला राष्ट्रपतींसमोर मान झुकवून उभे रहावे लागणार नाही. याला मनाई करण्यात आली आहे. हे निर्णय तातडीने लागू केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
विक्रमसिंघे यांनी देशातील राजकारण्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्यास सांगितले आहे. देशात केवळ शांततापूर्ण निदर्शनांना मान्यता दिली जाईल. कोणत्याही संघटनेने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. काही संघटना सैनिकांकडून शस्त्रे हिसकावत असून या हिंसाचारात आतापर्यंत २४ सैनिक जखमी झाले आहेत, असा इशारा त्यांनी दिला.