Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू

By जयदीप दाभोळकर | Published: July 13, 2022 01:10 PM2022-07-13T13:10:09+5:302022-07-13T13:10:36+5:30

Sri Lanka Crisis : देशात आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बुधवारी शेकडो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

Sri Lanka crisis Live Updates PM declares state of emergency impose curfew after president flees | Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू

googlenewsNext

Sri Lanka Crisis : राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, श्रीलंकेत आता आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यासोबतच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे काळजीवाहू राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर जात आहे. लोक विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनाही जमावाविरोधात अश्रुधुराचा वापर करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून देशात आणीबाणी लागू केली आहे. तसंच प्रश्चिम प्रांतात कर्फ्यू लागू केला आहे, अशी माहिती विक्रमसिंघे यांच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. बुधवारी मोठ्या प्रमाणात आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष दोघांनीही सरकारच्या बाहेर राहावं अशी लोकांची मागणी असल्याचं श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी सल्लागारांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.


"पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. संविधानानुसार जर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिला, तर पंतप्रधान काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष बनतात. लोकांना ते दोघंही पगावर नको आहेत. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत कारवाई केली आहे," असं त्यांनी सांगितलं. कोलंबोमध्ये वाढता विरोध पाहता सुरक्षा दलाच्या जवानांनी हवाई गस्त सुरू केली आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष विना राजीनामा स्वाक्षरी केल्याशिवाय देश सोडून गेले आहे. अध्यक्ष आणि संपूर्ण देशाला ते व्यवस्थितरित्या राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे. जेणेकरून पुढील आढवड्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक घेता येईल. हे संसदेवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षाचे खासदार पताली चंपिका रणवाका यांनी दिली.

Web Title: Sri Lanka crisis Live Updates PM declares state of emergency impose curfew after president flees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.